रायपूर : छत्तीसगडच्या सुकमा-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील गोगुंडा पर्वतीय जंगलाजवळ शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत 11 महिलांसह 18 नक्षलवादी ठार झाले आहेत.
राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, आतापर्यंत 18 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. सुरक्षा दलांनी शुक्रवारपासूनच नक्षलविरोधी मोहीम सुरू केली होती. केरला पाल पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. घटनास्थळी आधुनिक शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. सध्या शोधमोहीम सुरू आहे. या चकमकीत 2 जवान जखमी झाले असले, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या नक्षलवादविरोधी मोहिमेत सुकमा जिल्हा राखीव सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दल यांचा समावेश होता. गृहमंत्री विजय शर्मा यांनी नक्षलवाद्यांचे पूर्ण निर्मूलन 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 एप्रिल रोजी दंतेवाडा भेटीवर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दंतेवाडातील ही चकमक मार्च महिन्यात बस्तरमधीलही पाचवी मोठी चकमक आहे.
बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात एक महिला जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी स्फोटात महिला गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.