ओडिशात 15 वर्षीय मुलीला जिवंत जाळले Pudhari File Photo
राष्ट्रीय

girl burnt alive case | ओडिशात 15 वर्षीय मुलीला जिवंत जाळले

मैत्रिणीकडे जात असताना तरुणांचे कृत्य

पुढारी वृत्तसेवा

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : ओडिशातील पुरी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील बलंगा परिसरात शनिवारी सकाळी काही तरुणांनी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या अमानुष हल्ल्यात गंभीररीत्या भाजलेल्या मुलीला स्थानिक नागरिकांनी वाचवून रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी तिच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी त्या परिसरात गेली होती. त्यावेळी अचानक तीन ते चार तरुणांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी मुलीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला आग लावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेत मुलीला वाचवले. तिला आधी पिपिली येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात आणि नंतर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.

पुरीचे प्रभारी पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल. अद्याप याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही आणि स्थानिक ग्रामस्थ माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, असेही ते म्हणाले. पीडितेच्या कुटुंबीयांनी आपले कोणाशीही वैर नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याणमंत्री पार्वती परिदा यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच फकीर मोहन महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीच्या आत्मदहनाच्या घटनेनंतर आता ही घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT