Andhra Pradesh Chainsaw attack on schoolgirl
अनंतपूर: आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे शाळेच्या वर्गात घुसून दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर लाकूड कापण्याच्या कटरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपी तरुण हा पीडित मुलीचा मामा असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकतर्फी प्रेमातून तो गेल्या काही दिवसांपासून तिचा छळ करत होता, असेही स्पष्ट झाले आहे.
शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अनंतपूर येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. आरोपी हेमंत (उर्फ डुम्मु) हा मूळचा श्री सत्य साई जिल्ह्यातील नागलूर गावचा रहिवासी असून, तो अनंतपूरजवळील अय्यावरीपल्ले येथे त्याच्या मोठ्या बहिणीकडे राहत होता.
शनिवारी सकाळी वर्ग सुरू असताना आरोपी अचानक कटर हातात घेऊन वर्गात शिरला. मुलीला काही समजायच्या आतच त्याने तिच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे.
हल्ल्याच्या वेळी वर्गात उपस्थित असलेल्या राजेश्वरी या शिक्षिकेने घटनेचा थरारक घटनाक्रम सांगितला. आरोपी अचानक आवाज करणारे एक उपकरण घेऊन वर्गात घुसला. सर्व काही इतक्या वेगाने घडले की, त्याच्या हातात नेमके काय आहे, हे सुरुवातीला लक्षात आले नाही, असे त्यांनी सांगितले.
“आरोपीने अचानक मुलीवर झडप घातली आणि झाडे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाने काही सेकंद तिच्यावर वार केले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला,” असे राजेश्वरी यांनी सांगितले.
या हल्ल्यामुळे वर्गातील विद्यार्थिनी घाबरून किंचाळू लागल्या. पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हल्ला रोखण्याचा प्रयत्न करताना तिच्या शेजारी बसलेल्या अन्य काही मुलींनाही दुखापत झाली. हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आरोपी ओरडत होता आणि त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला, असेही शिक्षिकेने सांगितले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला सुरुवातीला अनंतपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री वाय. सत्यकुमार यांनी दिली.
मात्र, मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी विशेष रुग्णवाहिकेतून बंगळूर येथील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. “मुलीला बंगळूरातील खासगी रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेला ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून देण्यात आला आहे,” असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. मुलीच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.