Rape Case file photo
राष्ट्रीय

Jharkhand MLA POCSO Case: आमदाराने शासकीय निवासस्थानी नको नको ते केलं; १४ वर्षीय मुलीची तक्रार, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

एका १४ वर्षीय आदिवासी मुलीने काँग्रेसचे आमदार भूषण बारा यांच्यावर बलात्कार, शारीरिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jharkhand MLA POCSO Case

रांची: झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका १४ वर्षीय आदिवासी मुलीने काँग्रेसचे आमदार भूषण बारा यांच्यावर बलात्कार, शारीरिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. रांची येथील आमदारांच्या शासकीय निवासस्थानी ही घटना घडल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आमदारांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भाजपने या प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य करत आमदारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

धुर्वा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रांची येथील आमदारांच्या निवासस्थानी भूषण बारा यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. या कथित अत्याचारानंतर आपण गर्भवती राहिल्याचा, मात्र त्यानंतर गर्भपात झाल्याचाही दावा तिने केला आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान ही बाब समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सिमडेगा येथील रहिवासी असलेल्या या मुलीला मे महिन्यात आमदारांच्या कुटुंबीयांनी शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन रांची येथे आणल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, शाळेत प्रवेश देण्याऐवजी तिला आमदारांच्या शासकीय निवासस्थानी घरकाम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, मुलीने विरोध केल्यानंतर आमदारांनी तिला मारहाण केली. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे. आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनही आपला छळ आणि गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप मुलीने केला आहे.

हटिया विभागाचे पोलीस उपअधीक्षक नीरज कुमार यांनी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. डीएसपी नीरज कुमार म्हणाले, "आम्ही सिमडेगा विधानसभा मतदारसंघातील आमदारांविरुद्ध POCSO कायदा आणि ज्युवेनाईल जस्टिस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे." पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून, तिचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार भूषण बारा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या काही व्यक्तींनी राजकीय हेतूने हे प्रकरण रचल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांच्या तपासानंतर सत्य समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT