AI study app AI Photo
राष्ट्रीय

AI अ‍ॅपमधून १३ वर्षांच्या मुलीने ३ दिवसांत कमावले २.५ लाख

प्रोग्रामिंग किंवा कोडिंगचे कोणतेही ज्ञान नसतानाही चीनमधील एका १३ वर्षीय मुलीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने अ‍ॅप तयार करून अवघ्या तीन दिवसांत २.५ लाख रुपये कमावले आहेत.

मोहन कारंडे

AI study app

बीजिंग : प्रोग्रामिंग किंवा कोडिंगचे कोणतेही ज्ञान नसतानाही चीनमधील एका १३ वर्षीय मुलीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने अ‍ॅप तयार करून अवघ्या तीन दिवसांत तब्बल १८ हजार युआन म्हणजेच सुमारे २.५ लाख रुपये कमावले आहेत. मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेल्या या AI अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळाला.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, शांघायमधील ज्युनिअर सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या झू शुहान हिने ‘झाई चांग’ नावाचे हे अ‍ॅप तयार केले आहे. पालक जवळ नसताना अभ्यास करताना स्वतःसह अनेक मुलांचे लक्ष विचलित होत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातूनच तिला हे अ‍ॅप तयार करण्याची कल्पना सुचली.

हांगझोऊ येथे २१ ते २३ ऑगस्टदरम्यान आयोजित राष्ट्रीय AI उत्पादन विपणन स्पर्धेत या अ‍ॅपचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत तांत्रिक कौशल्याऐवजी AI उत्पादनातून किती महसूल मिळतो, याच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. ५० हून अधिक स्पर्धकांमध्ये झूने तिसरा क्रमांक पटकावला आणि ७० हजार रुपयांचे रोख पारितोषिकही मिळवले. या तीन दिवसांच्या स्पर्धेदरम्यान झूच्या अ‍ॅपला तब्बल ९० ऑर्डर मिळाल्या. त्यातून एकूण सुमारे २.५ लाख रुपयांची विक्री झाली.

अ‍ॅप कसे काम करते?

या अ‍ॅपमध्ये पालकांना स्वतःचा फोटो अपलोड करता येतो. त्यानंतर AI त्या फोटोच्या आधारे पालकांची आभासी प्रतिमा तयार करते. ही ‘व्हर्च्युअल पालक’ प्रतिमा मुलाच्या अभ्यासाच्या वेळी त्याच्यावर लक्ष ठेवते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर खेळत असल्याचे किंवा अभ्यासाच्या जागेवरून उठल्याचे आढळल्यास आभासी पालक आवाजाच्या माध्यमातून त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना देते. अभ्यासाचे सत्र संपल्यानंतर अ‍ॅप मुलाच्या एकाग्रतेचा अहवालही तयार करते.

अ‍ॅप बनवण्याची कल्पना कशी सुचली?

झूने सांगितले की, तिचे पालक कामात व्यस्त असल्यामुळे अनेकदा तिला एकटीला अभ्यास करावा लागत असे. त्यावेळी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात असल्याने तिला ‘डिजिटल पालक’ तयार करण्याची कल्पना सुचली. मुलांना शिस्त लावण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यासाठी तिने हे अ‍ॅप विकसित केले.

विशेष म्हणजे, झूला स्वतःला कोडिंग येत नाही. तिने केवळ तिची कल्पना एका मोठ्या भाषा मॉडेलला समजावून सांगितली. AI ने त्यानुसार अ‍ॅपचा कोड तयार करण्यास मदत केली. डिझाइनपासून संपूर्ण अ‍ॅप तीन ते चार दिवसांत पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. ‘या अ‍ॅपच्या निर्मितीच्या अनुभवातून मला जाणवले की, तुमच्याकडे चांगली कल्पना असेल तर AI तिचे प्रत्यक्ष रूपात रूपांतर करू शकते,’ असे झूने सांगितले. अ‍ॅपला मागणी वाढत राहिल्यास भविष्यात ते अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा तिचा मानस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT