Jammu and Kashmir cloudburst
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) मचैल माता यात्रेच्या मार्गावरील चिशोती या दुर्गम गावात ढगफुटी झाली. ज्या ठिकाणी ढगफुटी झाली तेथे १२ जणांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर, यात्रा स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जीवितहानीबद्दल नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त केले आहे. "चिसोती किश्तवाड येथील ढगफुटीच्या घटनेने व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या संवेदना आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. प्रशासन, पोलिस, लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना तत्काळ बचाव आणि मदतकार्य करण्याचे आणि बाधितांना सर्व शक्य ती मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत," असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
या घटनेनंतर केंद्रीय मंत्री जितेंद सिंह यांनी जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. अतिरिक्त बचाव पथकांना ढगफुटीच्या ठिकाणी पोहोचणे अवघड बनले आहे. तरीही ते सर्व अडचणींना सामना करत तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्ता वाहून गेला आहे. प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टरने जाणे अशक्य बनले आहे. दरम्यान, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके पाठवली जात आहेत, असे जितेंद्र सिंह यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.