Stray Dog Killing file photo
राष्ट्रीय

Stray Dog Killing: ५०० नंतर आता आणखी १०० भटक्या कुत्र्यांची विष देऊन हत्या; सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Hyderabad Stray Dogs Poisoned: रंगारेड्डी जिल्ह्यातील याचाराम गावात आणखी १०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले आहे. या घटनेमुळे प्राणीमित्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Stray Dog Killing

हैदराबाद: तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील याचाराम गावात आणखी १०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले आहे. या घटनेमुळे प्राणीमित्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तेलंगणाातील तीन जिल्ह्यांमध्ये ५०० हून अधिक कुत्र्यांच्या सामूहिक हत्येनंतर अवघ्या काही दिवसांतच ही नवीन घटना घडली आहे.

हैदराबादपासून हे गाव साधारण ५० किमी अंतरावर आहे. ही हत्या देखील सराईत लोकांकडून करून घेण्यात आली असून, यामध्ये गावचे सरपंच आणि त्यांच्या साथीदारांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. मृत कुत्र्यांचे अवशेष अद्याप हस्तगत करण्यात आलेले नाहीत.

सरपंचासह ग्रामसचिवावर गुन्हा दाखल

'स्ट्रे अ‍ॅनिमल फाउंडेशन ऑफ इंडिया'च्या मुदावत प्रीती यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी गावच्या सरपंचासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५, ३(५) आणि 'प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक कायदा' (PCA) कलम ११(१)(a)(i) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी एक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसचिवावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉग किलर्सकडून हत्या

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ही घटना १९ जानेवारी रोजी घडली असून कुत्र्यांचे मृतदेह गावाबाहेर पुरले असण्याची शक्यता आहे. याचाराम पोलीस ठाण्याचे एसएचओ ए. नंदेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, "आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत आणि कुत्र्यांचे मृतदेह कुठे पुरले आहेत याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

दरम्यान, प्राणी हक्क कार्यकर्त्यांना असा संशय आहे की, यापूर्वी कामारेड्डी, हनमकोंडा आणि जगतियाल येथे घडलेल्या घटनांप्रमाणेच, येथेही सराईत "डॉग किलर्स" कडून घातक इंजेक्शन देऊन या भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे.

कुत्र्यांना दिले विषारी इंजेक्शन?

तक्रारीनुसार, "प्राणीमित्र दीपिका पिंगळी यांनी फोनवर विचारले असता एका ग्रामपंचायत सदस्याने सांगितले की कुत्र्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. मात्र, नंतर जेव्हा दुसरे कार्यकर्ते आदुलापुरम गौतम यांनी त्याच सदस्याशी संपर्क साधला, तेव्हा त्याने कुत्र्यांना भूल देण्याचे इंजेक्शन दिल्याचे सांगितले. गावकऱ्यांकडे अधिक चौकशी केली असता असे समोर आले की, कुत्र्यांना प्रत्यक्षात विषारी इंजेक्शन देण्यात आले होते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT