पुढारी ऑनलाईन : मागील काही महिन्यांपासून शांततेकडे वाटचाल करणार्या मणिपूर राज्यात आज (दि.८) पुन्हा एकदा हिंसाचाराचे गालबाेट लागले. राज्यातील वाहतूक सुरळीत करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली. यावेळी इम्फाळ-दिमापूर महामार्गावर कुकीसमुदायाच्या सदस्यांमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकाचा मृत्यू झाला असून, २७ सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीवेळी केंद्रीय गृहंमत्री अमित शहा यांनी ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोकांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. आज याची अंमलबजावणी करण्याचा पहिला दिवस होता. इम्फाळहून सेनापतीकडे जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्याला कुकीबहुल भागात थांबवण्यात आल्याने तणाव वाढला. सुरक्षा दलांनी हस्तक्षेप केला आणि सौम्य बळाचा वापर केला. निदर्शकांना पांगवण्यात आले आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर नागरिकांच्या हालचालीसाठी मार्ग मोकळा होऊ शकला. कानपोक्पीमध्ये, विशेषतः राष्ट्रीय महामार्ग २ च्या बाजूच्या भागात तणाव वाढल्याने, स्थानिक अधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केला आहे. शुक्रवारी सरकारी वाहनांच्या हालचालीत अडथळा आणण्यासाठी टायर जाळून राष्ट्रीय महामार्ग २ (इम्फाळ-दिमापूर महामार्ग) रोखणाऱ्या संतप्त निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तथापि, निदर्शकांनी खाजगी वाहनांना आग लावण्यास सुरुवात केली आणि सेनापती जिल्ह्यात जाणाऱ्या राज्य परिवहन बसला थांबवण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
मणिपूरमध्ये सुमारे दोन वर्षांपासून मेइतेई आणि कुकी समुदायाच्या संघर्षात २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी इम्फाळ ते कांगपोक्पी आणि चुराचंदपूर अशी सार्वजनिक बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी झाला होता. शनिवारपासून राज्यातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पहिल्या मार्गावर, इम्फाळ ते कांगपोक्पी जिल्हा मार्गे सेनापती आणि दुसऱ्या मार्गावर, इम्फाळ ते बिष्णुपूर मार्गे चुराचंदपूर या बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.