National Birds Day 2024 
Latest

National Birds Day 2024: भवतालची पाखरं गेली कुठं? जाणून घ्या याविषयी

मोनिका क्षीरसागर


अंगणात खेळायला चिमण्या नाहीत. घाटावर निवद शिवायला कावळा नाही. रानात मोर नाहीत. नदीकाठाला बगळे नाहीत. बाकी बुलबुल, टिटव्या, मोर, बदकं कुठं गायब झाली माहिती नाही. माणसांचीच गर्दी इतकी झाली की, पक्ष्यांच्या अधिवासात अतिक्रमण करून, प्रद्यण करून पक्ष्यांच्या प्रजाती नेस्तनाबूत करण्याचं क्रौर्य त्यानं केलं. (National Birds Day 2024)

कृष्णा-वारणाकाठ म्हणजे हिरवागार आणि निसर्गानं वरदहस्त दिलेला काठ. उसाच्या फडात आणि घनदाट झाडीत हजार जातीचे पशु-पक्षी बिनधास्त राहतात. नदीत मगरी आणि काठावर पक्ष्यांचं वैभव जपणारे हे नदीकाठ… आज त्यांची अवस्था काय आहे? कीटकनाशके आणि तणनाशकाची बारोमास फवारणी करून तण आणि कीटकांचा नाश करण्याच्या नादात नदीकाठच्या पक्षी आणि जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. केमिकलयुक्त पाण्यानं नदीत लाखो मासे मरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रदक्षणाचे निर्देशक असलेले पाणकावळ्यांची संख्याही खूप वाढलेली दिसते. (National Birds Day 2024)

National Birds Day 2024: हरिपूरचे वैभव

हरिपूरच्या संगमावर गावाच्या बाजूला, हतात्मा स्मारकाभोवती मोठमोठी झाडं आहेत. या झाडांवर हजारो पक्षी राहतात. पहाटे आणि संध्याकाळी या पक्ष्यांच्या किलबिलाटानं सारा परिसर दणाणून गेलेला असतो. पारावरच्या झाडावर तर पोपटांचा आवास आहे. याच घाटावर भेळ खायला सोकावलेले कावळे पण आहेत. हे वैभव हरिपूरकरांनी जपलं आहे.

वटवाघळांना संरक्षण गरजेचे

सांगलीवाडीच्या घाटावर, चिंचेच्या बनात वटवाघळांची प्रचंड मोठी वस्ती आहे. दिवसभर ती इथंच लटकून असतात, संध्याकाळनंतर या बटवाघळांचे थवेच्या थवे काठावर उडताना दिसतात, मध्यंतरी अंधश्रध्देतून त्यांच्या शिकारी सुरू होत्या. ही वटवाघळे जपण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे, शिवाय त्यांची शिकार करणाऱ्यांना कडक सजा झाली पाहिजे.

पक्षी वाचवायचे असतील तर त्यांचे नैसर्गिक अधिवास अगोदर टिकवले पाहिजेत, त्यांची प्रजातीनिहाय गणना झाली पाहिजे. चुकीची अधिवास निर्मिती थांबली पाहिजे, उदाहरणार्थ माळरान हे माळरानच राहिले पाहिजे. तिथं झाडी लावली तर स्थानिक प्रजाती नामशेष होतातच, शिवाय आक्रमक प्रजाती तिथं अतिक्रमण करतात. पक्ष्यांना आयतं अन्न देणं थांबवलं पाहिजे. त्यामुळं त्यांच्या नैसर्गिक सवयी बदलतात. संख्या वाढते, पण अन्न न मिळाल्यानं उपासमार वाढते, ध्वनी प्रदक्षणाचा स्वरयंत्रावर परिणाम होतोच, पण त्यांचा संवादही हरवतो. डॉल्बी, फटाक्यांमुळं तर जीवही जाऊ शकतो. पाणी आणि हवा प्रदक्षणाचाही गंभीर परिणाम त्यांच्या रोगप्रतिकार आणि प्रजनन क्षमतेवर होतो. हे प्रदक्षण थांबायलाच हवं. काचेच्या भिंतीवर आपटून, पतंगांचे मांजे, उच्चदाबाच्या विद्युततारा यामुळेही प्रजननक्षम प्रौढ पक्षी हकनाक मरतात. हे थांबणार कसे ? (National Birds Day 2024)

-अमोल जाधव

कही खुशी कही गम

नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य अमोल जाधव गेली काही वर्षे पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार, नदीकाठी सर्रास दिसणारे चित्रबलाक, रंगीत फटाकडी, काळ्या मानेचा करकोचा अलीकडं दिसत नाहीत. त्याउलट प्रदुषित पाण्यामध्ये तुतवार, पाणकावळे, तुतारी अशा प्रजातींची संख्या वाढलेली दिसते आहे. तसेच माळावरती बागडणाऱ्या धावीक, तणमोर, पकुर्डी या प्रजाती नामशेष झाल्यात जमा आहेत. शेतांमधले बारोमास दिसणारे भट तितर, तेनाचा पावसाळी दुर्लाव, मोर यांची संख्यासुध्दा खूप कमी झाली आहे. याच्या उलट बदललेल्या अधिवासांमुळं आणि चुकीच्या ठिकाणी केलेल्या वृक्ष लागवडीमुळं लालबुड्या बुलबुल, वटवट्यांच्या प्रजाती मात्र वाढलेल्या दिसून येतात.

सांगलीत विष्णू घाटावर भरपूर कावळे आहेत. फक्त सकाळी आणि रात्री इथं मुक्कामाला असतात. पण दशक्रिया विधीमुळं त्यांना फुकटचं खायला मिळाल्यामुळं ते शिकार विसरलेत. शंभरफुटीला कत्तलखाना परिसरात कावळे आहेत. कवठेपिरान कचरा डेपोवर कावळे आहेत. नदीत बगळे कमी असले तरी हळदी-कुंकू बदकांची संख्या वाढली आहे. बाहेरून येणारे चक्रवाक बदक आले आहेत. नदी स्वच्छ राहिली तर हे सारे पक्षी राहतील.

– संजय चव्हाण, विसावा मंडळ, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT