नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना पात्र ठरविल्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत ढोल-ताशांच्या गजरात पालकमंत्री दादा भुसे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठेका धरला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (दि.१०) जाहीर केला. नार्वेकर यांच्याकडून निकालपत्राचे वाचन सुरू असताना मायको सर्कल येथील शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी पदाधिकाऱ्यांच्या नजरा टीव्हीवर खिळून होत्या. नार्वेकर यांनी मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देताच शिंदे गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जोरदार विजयाच्या घोषणा देत कार्यालय दणाणून सोडले. भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता देताना गोगावलेंचा व्हिप योग्य असल्याचे नार्वेकर यांनी जाहीर करत शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचे जाहीर केल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यर्त्यांनी कार्यालयासमोर एकच जल्लोष केला.
धनुष्यबाणाचे चिन्हा हाती उंचावून धरत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या. यानंतर पालकमंत्री भुसे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात आरती केली. सत्याचा विजय झाल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे गटाकडून निषेध
एकीकडे शिंदे गटाकडून जल्लोष होत असताना ठाकरे गटाने मात्र या निकालाचा निषेध केला. यासंदर्भात ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयात वेळकाढूपणा केला. तेव्हाच निकाल काय असेल याची कल्पना आली होती. त्यामुळे आम्हाला या निकालाविषयी कोणतीही उत्सुकता नव्हती. हा निकाल लोकशाहीला मारक असून, चुकीची प्रथा पाडणारा आहे. पक्षांतरबंदी कायद्याची थेट पायमल्ली करणारा आहे. निकाल काहीही असला तरी मतदार मतपेटीतून गद्दारांना धडा शिकवतील, असा दावाही बडगुजर यांनी केला.
प्रभू श्रीरामचंद्राच्या आशीर्वादाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आज विजय झाला. शिवसेनेला कौल देऊन तमाम महाराष्ट्रातील जनतेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्याय दिला. वस्तुस्थितीला धरून दिलेल्या न्यायाचे स्वागत करतो. – दादा भुसे पालकमंत्री, नाशिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय झाला आहे. खऱ्या अर्थाने विधानसभा अध्यक्षांनी न्यायनिवाडा केला. या न्यायनिवड्यात सामान्य शिवसैनिकांचा विजय झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेली शिवसेना आज अधिकृत झाली. याचा आम्हाला अभिमान आहे. – अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट