Latest

Nashik News : इटलीच्या यांत्रिकी झाडूंचा दिवाळीचाही मुहूर्त हुकणार?

गणेश सोनवणे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा: रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने ईटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींच्या चार यांत्रिकी झाडूचा दिवाळीचाही मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात ही यंत्रे मुंबईच्या बंदरावर येणार असून, तेथून यंत्रांची तपासणी, चाचणी आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीच्या प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षात घेता दिवाळीत यांत्रिकी झाडूद्वारे शहर स्वच्छतेचे नाशिककरांचे स्वप्न अपुरे राहण्याची शक्यता आहे.

'स्वच्छ शहर' स्पर्धेत अव्वल येणाऱ्यासाठी आसुसलेल्या नाशिक महापालिकेने स्वच्छतेच्या नावावर 'होवू द्या खर्च' अशी भूमिका घेतली आहे. घंटागाडीचा ठेका १७६ कोटींवरून ३५४ कोटींवर तर पेस्ट कंट्रोलचा १८ कोटींचा ठेका थेट ४५ कोटींपर्यंत गेल्यानंतर आता पुन्हा यांत्रिकी झाडू खरेदीवर ३३ कोटींची उधळण महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. महापालिकेचे नियमित साधारण दोन हजार सफाई कर्मचारी असताना स्वच्छ शहर स्पर्धत पहिल्या दहा क्रमांकात येण्याच्या नावाखाली ७०० सफाई कर्मचारी खासगीकरणातून भरले गेले. हा ठेका वादात असताना केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधीमधून हवेची गुणवत्ता सुधारवण्याच्या नावाखाली प्राप्त ४१ कोटींच्या निधीचा हवाला देत यांत्रिक झाडू खरेदी केली गेली. विशेष म्हणजे, या चारही यांत्रिकी झाडूंची मूळ किंमत १२ कोटी असताना या यंत्रांच्या देखभाल दुरूस्ती व संचलनावरच तब्बल २१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. अहमदाबाद येथील ओम स्वच्छता कॉर्पोरेशन या मक्तेदारामार्फत ईटलीहून ही यंत्रखरेदी करण्यात आली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर ही यंत्रे नाशकात आणली जाणार असल्याचे सुरूवातीला सांगण्यात आले होते. परंतू अद्यापही ही यंत्रे मुंबईतील जहाज बंदरावर येऊ शकलेली नाहीत. साधारणत: आठवडाभरानंतर ही यंत्रे जहाजाने मुंबई बंदरावर आणली जातील. त्यानंतर त्याची प्रारंभी तपासणी केली जाईल. त्यानंतर चाचणी करून प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतरच ही यंत्रे रस्त्यावर स्वच्छतेसाठी उतरविली जाणार आहेत. त्यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळी झाल्यानंतरच ही यंत्रे कार्यान्वित होऊ शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT