Latest

Nashik News : नाशिक शहराला पावसाने झोडपले, चांदवडला वीज पडून महिलेचा मृत्यू

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी नाशिक शहर व परिसराला पावसाने तासभर झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने नाशिककरांची धावपळ ऊडाली. तर चांदवडला वीज अंगावर पडून एक महिला मृत्यूमुखी पडली. याच घटनेत इतर पाच जण जखमी झाले आहेत. (Nashik News)

गणेश विसर्जनाचा दिवसवगळता (दि.२८) मागील आठवड्याभरापासून नाशिकमध्ये पाऊस हजेरी लावतो आहे. शहर व परिसरात दिवसभराच्या ऊष्म्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानकपणे आकाशात काळे ढग जमा झाले. पुढील अर्धा तासात जोरदार पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर शहराला झोडपून काढले. पावसाचा वेग इतका प्रचंड होता की अवघ्या काही मिनिटांमध्ये रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहू लागले. तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. (Nashik News)

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. यावेळी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या.चांदवड तालुूक्यात उसवाड येथे मिनाबाई केदु बटाव (३३) यांच्या अंगावर वीज पडुून त्या गतप्राण झाल्या, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. बटाव कुटुंबीय शुक्रवारी (दि.२९) शेतात कांदे लागण करीत होते. त्यावेळी अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. यावेळी कांदे लागण करीत असलेल्या मिनाबाई केदु बटाव (३३) यांच्यासह हरी निवृत्ती बटाव (३३), गंगा रंगनाथ बटाव (२७), मनीषा हरी बटाव (२९), विशाल केदु बटाव (१८), केदु निवृत्ती बटाव (३५) या सहा जणांच्या अंगावर वीज पडली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मिनाबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT