Nashik News 
Latest

Nashik News: भ्रमात राहु नका, दादागिरी करू नका : भुजबळ यांचा घणाघात

मोनिका क्षीरसागर

इगतपुरी; पुढारी वृत्तसेवा: आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. आमचा इतर समाजाला दिलेल्या आरक्षणातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. तुम्ही महाराष्ट्र सात बाऱ्यावर घेतला काय? आरे त्यांना गावात येऊ द्या, बोलू द्या, पटलं तर ठीक नाहीतर सोडून द्या. कोण म्हणते भुजबळांना पाडेल, आरे पण भुजबळ किती जणांना पाडेल हे तुम्हाला माहित नाही. त्यामुळे भ्रमात राहू नका दादागिरी करणे हे धंदे सोडून द्या आणि एकमेकांची मते जाणुन घ्या, असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. (Nashik News)

यावेळी पुढे ते म्हणाले, मी ओबीसीसाठी ३५ वर्ष लढलो आणि यापुढे ही लढणार आहे. त्यामुळे कोणी ही अन्याय केला तर सहन करणार नाही असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला. फुले-शाहू-आंबेडकर यांना जपणारे शाहू महाराज बघा आणि तुम्ही काय करता; असा टोला देखील भुजबळ यांनी संभाजीराजे छत्रपती यांना दिला. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की मला आमदार, मंत्री याची अपेक्षा नाही, मी काम करेल ते गरिबांसाठीच करेल. आजपर्यंत कुठल्याही जातीचा माणूस आला तर, मी कधी त्याला जात विचारली नाही. मला ही कधी कोणी जात विचारली नाही. जनतेने मला निवडुन दिले म्हणुन मी त्यांचे काम करणे हे माझे कर्तव्य आहे. (Nashik News)

मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ते ओबीसी कोट्यातून देऊ नका. कारण आधीच तुटपुंजे आरक्षण असून त्याचे अजून तुकडे होतील. त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण व कायद्याप्रमाणे द्या, जेणेकरून ते कायम टिकले पाहिजे. अंतरवली सराटीमध्ये आधी पोलिसांवर अत्याचार झाले ते नाही दिसलं का तुम्हाला. त्यानंतर बीडमध्ये आमदारांची घरे जाळली, हॉटेल जाळली, घरे जाळली हे लोकांपर्यंत गेले नाही. लोकांपर्यंत गेला फक्त आंदोलन करणाऱ्यावर लाठीचार्ज आणि आज त्यालाच सहानुभूती मिळत आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे. आज मी फक्त वंजारी, माळी किंवा धनगर यांचे मी नेतृत्व करत नाही तर, ३७४ जातींचे प्रतिनिधित्व करत आहे. सर्व ओबीसीचं नेतृत्व मी करत आहे. तसेच मराठा समाजात देखील काही समजदार लोक आहेत. जे आम्हाला कुणबी नको आम्हाला मराठा पाहिजे असे लोक पण आहेत. (Nashik News)

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. तीनही गावांसाठी मुकणे धरणातून १४ कोटी रुपयांची लिफ्ट योजना मंजूर केल्यामुळे या भागातील सर्व शेतकरी बागायतदार होणार आहेत. तसेच जिल्हा नियोजनकडून वरील तीनही गावांसाठी चोवीस तास लाइट मिळविण्यासाठी निधि उपलब्ध करून हे काम पूर्ण झाले आहे. वरील तीनही गावांसाठी मॉडेल तलाठी कार्यालय बनविण्यात आले असून यावर पवनचक्की बसविण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तसेच तीनही गावांसाठी एका कंपनीच्या सी. एस. आर. निधीतून ३७५ घरे मंजूर करून ही कामे प्रगतिपथावर आहेत. सभागृहाचे भूमिपूजन, तीनही गावातील जेवणासाठी बनवलेल्या दोन सामाजिक सभागृह व विंचनरोडचा लोकार्पण सोहळा, मारुती मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन आदी विकास कामांचे भुमिपुजन व उदघाटन सोहळा मंत्री भुजबळ यांच्या हस्ते पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT