नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नोकरभरतीत भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रांद्वारे महिलेचे शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर पोलिस ठाण्यात सातपूरमधील छत्रपती शिवाजी विद्यालयातील समिती सदस्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांचाही समावेश आहे.
सातपूर येथील हौसिंग कॉलनी विविध विकास संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त रामराव आहेर (४०) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत सातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात फसवणूक केली. विविध विकास संघटनेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात संशयितांनी संगनमताने कागदपत्रांचे बनावटीकरण केले. संशयित ज्योती रतन गरुड यांना शासनाकडून आर्थिक लाभ देण्याच्या उद्देशाने शिक्षण उपसंचालक कार्यालयात वैयक्तिक मान्यतेनुसार प्रस्ताव सादर केला. असा दावा संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त रामराव आहेर यांनी न्यायालयात केला.
या दाव्यावरून न्यायालयाने संबंधित संघटनेच्या १० सदस्यांसह शालेय लिपिक, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी, कर्मचारी व संबंधित लाभ घेणारी महिला यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार सातपूर पोलिसांत संशयित तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्यासह बाळकृष्ण सावळीराम ढिकले, किसन कचरू जाधव, रामनाथ शिंदे, दादाजी शिंदे, संपत आहेर, नरेंद्र वाणी, पंढरीनाथ शिंदे, नारायण पवार, बन्सीलाल रायते, सखाराम पवार, लिपिक निवृत्ती आहेर, ज्योती गरुड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस अधिकारी करित आहे.
हेही वाचा :