Latest

Nashik News | ‘ई-चलान’ मार्फत गंडा घालण्याचा प्रयत्न; बनावट मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंटरनेटच्या मदतीने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडवण्यासाठी भामटे सक्रिय असतात. नुकताच पोलिसांना आणखीन एक प्रकार लक्षात आला असून, भामट्यांनी 'ई-चलान'चा मेसेज पाठवून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

'वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्या वाहनावर ई-चलानअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे', या आशयाचा बनावट इंग्रजी मेसेज पाठवून भामटे नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. दंड भरण्यासाठी पाठवलेली लिंक ही फेक असल्याचे उघड झाले आहे. शहरातील अनेक वाहनचालकांना या स्वरूपाचे बनावट 'ई-चलान' पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेत काही दिवसांपासून नागरिक ई-चलानअंतर्गत झालेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करीत आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर सायबर चोरट्यांनी वाहतूक ई-चलानचा मेसेज पाठवून गंडा घालण्याचा फंडा शोधल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, वाहतूक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहायक आयुक्त आनंदा वाघ यांचे पथक फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध घेत आहेत.

खात्री करा, प्रतिसाद टाळा
ज्या नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे ई-चलानचे मेसेज आले असतील. त्यांनी लिकंवरून कोणतेही ई-पेमेंट न करता वाहतूक पोलिसांकडे चलनची खात्री करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासह वाहतूक पोलिसांच्या नावे कोणतेही ॲप कार्यान्वित नाही. त्यामुळे व्हॉट्सॲपवर येणाऱ्या लिंकवरून ॲप डाउनलोड न करण्याचीही सूचना पोलिसांनी केली आहे.

ही खबरदारी घ्या
ई-चलानअंतर्गत मेसेज 'टेक्स्ट' स्वरूपात येतात. पोलिस व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवत नाही. ई-चलान दंडाची खातरजमा वाहतूक पोलिसांकडून केली जाऊ शकते. तसेच दंड केल्यास नियम मोडणाऱ्यांचे छायाचित्रही पोलिस पाठवत असतात. त्याचप्रमाणे https://mahatrafficechallan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ई-चलानची खात्री करू शकतात.

फेक मेसेज व एपीके ॲप नागरिकांनी डाउनलोड करू नये. ई-चलानसंदर्भात काही शंका, तक्रार किंवा अडचण असल्यास वाहतूक पोलिसांशी थेट संपर्क साधावा. मेसेज व्हायरल करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. – आनंदा वाघ, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT