Latest

Nashik Murder : बापानेच दिली व्यसनाधीन मुलाच्या खूनाची सुपारी

गणेश सोनवणे

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील पोलिस ठाणे हद्दीतील लोखंडेवाडी शिवारात पालखेड धरण भराव परिसरात मृत आढळलेल्या तरूणाच्या खूनाचे गुढ पोलिसांनी उलगडले असून दारु पिऊन शिवीगाळ करत पैशांची सतत मागणी करणाऱ्या मुलाची वडीलांनीच १८ हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे समोर आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी मयताच्या वडीलांसह तीन संशयीतांना ताब्यात घेतले असून संशयीतांमध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचाही समावेश आहे.

वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर पालखेड धरण भराव परिसरात किशोर उर्फ टिल्लु दगु उशीर (२६, रा. खडकजांब, ता. चांदवड) याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर अज्ञात हत्याराने गंभीर वार करुन त्यास ठार केल्याप्रकरणी मयताचे दाजी सुरेश सुधाकर कांडेकर (रा. खडकजांब, ता. चांदवड) यांनी वणी पोलिसांत फिर्याद दिली होती. याप्रकरणी निर्जनस्थळी खून झाल्यामुळे कुठलाही साक्षीदार नसताना तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते. परंतु गोपनीय व तांत्रीकदृष्ट्या तपास करत पोलिसांनी संशयीत संदीप छगन गायकवाड (३०) व त्याचा साथीदार एक १६ वर्षीय विधीसंघर्षीत मुलास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयित संदीपने मयताचे वडील दगु जयराम उशीर (५७, रा.खडकजांब ता. चांदवड) यांना त्यांचा मुलगा किशोर उर्फ टिल्लु हा दारु पिऊन सतत पैशाची मागणी करुन शिवीगाळ व दमदाटी करायचा. या त्रासाला कंटाळून त्याला जीवे मारण्याची सुपारी घेतल्याचे सांगत दोन्ही संशयीतांनी हत्या केल्याचे कबुल केले. या माहितीवरुन पोलिसांनी मयताचे वडील दगु जयराम उशीर यांना सोमवारी (दि.२७) ताब्यात घेतले असुन अधिक तपास सुरू आहे. तर संदीप यास मंगळवार (दि.२८) पर्यंत पोलिस कोठडी असून, विधीसंघर्षीत बालकास बालसुधार गृहात दाखल केले आहे.

तपासात पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गणेश शिंदे व कर्मचारी तसेच वणी पोलिस ठाण्याचे सपोनि निलेश बोडखे व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT