सिन्नर : पुढारी वृत्तसेवा, सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात गेल्या महिन्याभरापासून उच्छाद मांडलेल्या बिबट्यांपैकी एक सोमवारी मध्यरात्री जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. या भागात अद्यापही दोन बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नायगाव खोऱ्यात गेल्या महिनाभरात बिबट्यांच्या नऊ हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. सिन्नर बाजार समितीच्या नायगाव उपबाजार आवारा जवळील त्रंबक भांगरे यांच्या वस्तीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला. तथापि, अन्य तीन-चार भागातही वन विभागाने पिंजरे लावलेले आहेत. त्या भागातही बिबट्याचे दर्शन आणि हल्ला झालेला आहे. त्यामुळे या भागातील बिबट्या कधी जेरबंद होणार, असा प्रश्न अद्यापही नागरिकांच्या मनात कायम आहे.
दरम्यान, पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी उपवनसंरक्षक पंकज गर्ग नाशिक पश्चिम, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर मनीषा जाधव, वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनरक्षक संजय गीते, गोविंद पंढरे, वनसेवक बालम, पंकज कुराडे, रोशन जाधव, मधु शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पिंजरा ताब्यात घेतला.