Latest

Nashik Crime | खंडणीखोर वैभव देवरेकडे कोट्यावधींची ‘माया’; पोलिसांकडून राहत्या घराची झडती

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवैध सावकारीचे कर्जदाराकडून व्याजासकट पैसे वसुल केल्यानंतरही पुन्हा १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या संशयित वैभव यादवराव देवरे (रा. सीमा पार्क, चेतनानगर, इंदिरानगर) यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची 'माया' असल्याचे पोलिसांच्या झाडाझडीत उघडकीस आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) देवरेच्या राहत्या घराची झडती घेतली असता ५५ लाखांचे धनादेश, नऊ दुचाकी व चारचाकी वाहने, तीन फ्लॅट व एक रो-हाऊस असल्याची कागदपत्रे हस्तगत केली.

सिडको व परिसरात सावकारी करणाऱ्या संशयित देवरे याच्याविरोधात ब्रोकर्स व्यावसायिक विजय भालचंद्र खानकरी (रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार खंडणी व कुटुंबियास जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी देवरेच्या मुसक्या आवळत त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी पोलिसांनी देवरेच्या घराची झडती घेतली. पोलिसांना त्याच्या स्वत:च्या १५ बँकांच्या खात्याचा तपशील प्राप्त झाला. या १५ बँकांचे चेकबुक आढळून आले. त्यामध्ये सहा बेरर धनादेश तर तीन जगन पाटील व तीन कंदुरी हॉटेल्स असे एकुण ५५ लाख किंमतीचे धनादेश मिळून आले. या बरोबरच पाच चारचाकी व चार दुचाकी अशी एकूण नऊ वाहने आढळून आली. याव्यतिरिक्त पाच फार्म हाऊसेस, पत्नीच्या नावे तीन फ्लॅट्स व एक रो-हाऊस असल्याचा तपशील पोलिसांना मिळून आला. अवैधरित्या सावकारीतून संशयित देवरेने ही माया जमविल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

देवरे याचा सिडकोसह शहरात अवैधरित्या व्याजाचा धंदा चालतो. त्याने अनेकांच्या आर्थिक कमजोरीचा गैरफायदा घेत ही माया जमविली असावी. मध्यंतरी त्याने त्याच्या मुलीस वाढदिवसाला महागडी कार भेट दिल्याची सिडकोत मोठी चर्चा झाली होती. तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे.

याप्रकरणी अटकेत

फिर्यादी विजय खानकरी याने, सप्टेंबर २०२३ मध्ये आजारी असल्या कारणाने वैद्यकीय उपचारासाठी देवरे याच्याकडून तीन लाख रुपये व्याजाने मागितले होते. देवरे याने दरमहा १० टक्के व्याजदर लागेल, असे सांगून ३ लाखांची रक्कम त्याने आरटीजीएसद्वारे खानकरींच्या बँक खात्यावर पाठविली. व्याज न भरल्यास ३ लाखांचे सहा लाख रुपये भरावे लागतील, असा सज्जद दम दिला होता. मात्र, खानकरी यांनी देवरेला व्याजाच्या रकमेसह चार लाख ४७ हजार रूपये दिले. व्याजापोटीच केवळ एक लाख ३२ हजार रुपये दिले. सर्व हिशेब पूर्ण झाल्याने खानकरी यांनी देवरेकडे जमा केलेला 'सिक्युरिटी चेक' घेण्यासाठी गेले असता संशयिताने टाळाटाळ केली. त्यानंतर मात्र, संशयित देवरे याने फिर्यादी खानकरी यांना बोलावून घेत, आर्थिक व्यवहार दोन महिन्यांसाठी ठरला असताना तू वेळेत व्याज व रक्कम दिली नाही. त्यामुळे रक्कम व व्याज मिळून १२ लाख रुपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास कुटुंबियांचे बरे-वाईट करण्याची धमकी देत त्याच्या पत्नीविषयी अश्लिल भाष्य केले होते.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT