नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीच्या प्रमुखपदी भारतीय जनता पार्टी तर्फे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली. या संदर्भात सानप यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक यापूर्वी २०१५ मध्ये पार पडली होती. त्यावेळेला निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण धुरा माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडेच होती. त्यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डात आठ पैकी पाच जागांवर भाजपने दणदणीत एक हाती विजय मिळविला होता तर एक जागेवर भाजप रिपाई चा उमेदवार निवडून आला होता. उर्वरित दोन जागेपैकी एका जागेवर शिवसेना तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. म्हणजेच २०१५ मध्ये झालेल्या देवळाली कॅन्टोन्मेंट निवडणुकीमध्ये सानप यांच्या नेतृत्वाखाली कमळ फुललेले होते.
तत्पूर्वी देवळाली कॅन्टोन्मेंट निवडणुकीमध्ये शिवसेनेची सत्ता होती. २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा एकदा सानप यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट बोर्डात कमळ फुलवेल अशी अपेक्षा भाजप मध्ये व्यक्त केली जात आहे.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड वॉर्ड आरक्षण
प्रभाग आरक्षण – वॉर्ड १ अनुसूचित जाती (पुरुष), वॉर्ड २ सर्वसाधारण, वॉर्ड ३ महिला राखीव, वॉर्ड ४ सर्वसाधारण, वॉर्ड ५ अनुसूचित जाती (महिला), वॉर्ड ६ सर्वसाधारण, वॉर्ड ७ महिला राखीव, वॉर्ड ८ सर्वसाधारण.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत देवळाली कॅन्टोन्मेंट निवडणुकीच्या प्रमुखपदी माझी निवड केली. भाजप २०१५ मधील निवडणूकी प्रमाणे पुन्हा एकदा देवळालीत भाजपचे कमळ फुलेल.
बाळासाहेब सानप, माजी आमदार
माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी नाशिक महापालिका व देवळाली कॅम्प निवडणूकीत भाजपला घावघावित यश मिळाले आहे. देवळालीत २०१५ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होइल.
– गणेश सातभाई