Latest

नाशिक : घरगुती पीठाच्या गिरणीत अडकून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू

गणेश सोनवणे

नाशिक(पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

इंद्रकुंड भागात घरगुती पीठ गिरणीच्या बेल्टमध्ये अडकल्याने ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाऊस, इंद्रकुंड, पंचवटी) असे मृत बालकाचे नाव असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबियांनी गुरूवारी दळण दळण्यासाठी घरगुती आटा चक्की मशिन सुरू केले होते. दळण टाकून श्रीमती शर्मा नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त असतांना ही घटना घडली. रिहान घरात खेळत असतांना गिरणीजवळ गेला. खेळता खेळता तो मोटारीच्या बेल्टमध्ये अडकला अचानक आवाज झाल्याने शर्मा यांनी धाव घेतली असता सदरचा प्रकार समोर आला.

या घटनेत रिहानचे शरीर बेल्टमध्ये अडकल्याने कोवळया हाडांचा चेंदामेंदा झाला होता. कुटुंबियांनी त्यास तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्याची अनेक हाडे फॅक्चर असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू असतांना रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. धवल यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहे.

"पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे"

लहान मुले घरामध्ये खेळत असतांना अनेक दुर्घटना घडत असल्याचे व त्यातून बालकांचा मृत्यू किंवा मोठी दुखापत होण्याच्या घटना घडत असतात. मुले घरात खेळत असतांना त्यांच्या पालकांचे घरगुती कामानिमित्त त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, यातूनच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. बऱ्याचदा घराच्या गॅलरीतून पडून दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. मात्र खेळता – खेळता मोटरच्या बेल्टमध्ये अडकल्याने दुर्घटना घडणे ही एक अनपेक्षित घटनाच होय.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT