365 दिवस भरणारी शाळा,www.pudhari.news 
Latest

Nashik : वर्षातील 365 दिवस अन् रोज बारा तास भरणारी ‘हिवाळी’शाळा

गणेश सोनवणे

नाशिक : गणेश सोनवणे, देवयानी ढोन्नर 

ग्रामीण भागातील जिल्हापरिषदेच्या शाळेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन अनेकदा नकारात्मकच असतो. परंतु हा दृष्टिकोन बदलवणारी एक आदर्श शाळा नाशिक जिल्ह्यात आहे. ही शाळा वर्षाचे 365 दिवस भरते. एकही दिवस या शाळेला सुट्टी नसते. रोज बारा तास चालणारी ही शाळा आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलपासून 40 किलोमीटर अंतरावर हिवाळी नावाचे गाव आहे. येथील जिल्हापरिषदेच्या शाळेतील शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांमुळे हे गाव राज्यात सर्वत्र परिचित झाले आहे. डोंगरदऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या हिवाळी गावची लोकसंख्या अवघी दोनशे च्या आसपास आहे. पायाभूत सुविधांची वाणवा असतानाही या शाळेने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.

365 दिवस ही शाळा भरते. विद्यार्थ्यांना दररोज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे या शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना तब्बल ४०० पेक्षा अधिक पाढे तोंडपाठ असून भारतीय संविधानातील सगळीच कलम पाठ आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग, जगभरातील देशांच्या राजधान्या हे देखील या शाळेतील विद्यार्थी पुस्तक न पाहता सांगतात. इतकंच नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचारण्यात येणारी गणिते आणि तार्किक प्रश्नांची उत्तरेही हे विद्यार्थी अचूक देतात.

याशिवाय दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहिण्याची कलाही येथील विद्यार्थ्यांना अवगत आहे. याशिवाय दोन वेगवेगळ्या विषयांचे लिखाण वहितील डाव्या आणि उजव्या पानावर एकाच विळी दोन्ही हातांनी विद्यार्थी करतात.

हिवाळी शाळेला या उंचीवर नेऊन ठेवलय ते अवलिया शिक्षक केशव गावित यांनी. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर आपला भर असल्याचे शिक्षक केशव गावित सांगतात. येथील विद्यार्थी विविध कलागुणांमध्ये पारंगत आहेत. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चकीत करणारी आहे. यामध्ये पेंटर, फिटर, टीचर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर आदी कामे विद्यार्थी स्वतः करतात. हिवाळी शाळेत प्रवेश करताच सर्व भिंती वारली पेंटिंगने तसेच विविध नद्या, फळे, गावांची नावे याने रंगवल्याचे नजरेस पडते. बालवाडीच्या वर्गांमध्ये खेळणी, शाळेत डिजिटल रूम, वाचनालय यासोबतच सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी प्रोजेक्ट रूमही येथे तयार करण्यात आली आहे. याशिवाय अनेक टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत.

हिवाळी शाळेचे शिक्षक केशव चंदर गावित यांचा परिचय…

शिक्षक केशव गावित यांनी एम. ए. राज्यशास्त्र आणि डी.एड.चे शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचीही तयारी सुरु केली. घऱची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांच्यावर मार्केट यार्डात ४० रुपये रोजाने हमाली करण्याची वेळ आल्याचेही ते सांगतात.

एकीकडे हमाली तर दुसरीकडे उरलेल्या वेळेतून एमपीएससीचा अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या घरात सन २०१३ पर्यंत विजेचा दिवाही नव्हता. त्यामुळे रात्रीच्या वेळी चिमणीच्या प्रकाशातच अभ्यास होत. परंतु, तरीही यशाने त्यांना हुलकावणी दिली. हीच मनातील तगमग आणि अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांनी पूर्ण कराव अशी इच्छा मनाशी बाळगून ज्ञानदानाची अविरत सेवा ते करत आहे.

"आपला शैक्षणिक पाया पक्का असता तर आपण एम.पी.एस.सी उत्तीर्ण झालो असतो, ही खंत माझ्या मनाला अस्वस्थ करत होती. अशातच डीएड पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये हिवाळी येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. शाळेत आल्यावर माझा दृष्टीकोन बदलला. आपले स्वप्न या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे मनोमन ठरविले. ज्यावेळी शाळेत रुजू झालो, त्यावेळी केवळ एकच वर्ग खोली होती. त्यानंतर गावातील दोन लोकांनी पुढाकार घेऊन शाळेसाठी आपले राहते घर सोडले. या दोघांच्या घराच्या जागेवर आज छानशी एक टुमदार शाळा उभी राहिली असून, विद्यार्थीही याचा पुरेपूर फायदा घेऊन एमपीएससी, युपीएससी परीक्षेसाठी शालेय जीवनातच धडे गिरवत आहेत. याचा मला मनोमन आनंद व समाधान आहे.

– केशव चंदर गावित, शिक्षक हिवाळी शाळा

 हिवाळी शाळेत राबवित असलेले उपक्रम व वैशिष्ट्ये

365 दिवस व वर्षभर नियमितपणे सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत शाळा भरते.

दोन वेगवेगळ्या विषयांचे लिखाण वहितील डाव्या आणि उजव्या पानावर एकाच विळी दोन्ही हातांनी विद्यार्थी करतात.

इयत्ता पहिलीत दाखल होण्याआधीच म्हणजे बालवाडीतच मुलांकडून लेखन, वाचन करुन घेतले जाते.

400 पर्यंतचे पाढे मुलं सहज म्हणतात.

घटनेतील कलम देखील विद्यार्थ्यांची पाठ आहेत.

कर्स्यू राइटिंग देखील विद्यार्थ्यांना येते

स्पर्धा परीक्षेची तयारी देखील याच वयात विद्यार्थ्यांकडून करुन घेतली जात आहे.

 100% विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण.

रूबिक क्यूब, वेल्डिंग, इलेक्ट्रीक, शिवणकाम, गवंडीकाम, शेतीकाम अशी कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात आहेत.

इंग्रजी भाषेचाही अभ्यास विद्यार्थ्यांकडून करुन घेतला जातो. विद्यार्थी इंग्रजी बोलतात.

गावातील घरांच्या भिंतीवरती विदयार्थ्याच्या द्वारे वारली पेंटिंग्ज.

राज्य घटनेचे कलम पाठांतर, सामान्यज्ञानावर भर.

पाहा फोटो :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT