file photo 
Latest

Nandurbar Accident : प्रवाशांसह पिकअप गाडी ८०० मीटर दरीमध्ये कोसळली, चौघांचा मृत्यू

गणेश सोनवणे

नंदुरबार – धडगाव-तोरणमाळ रस्त्यावरील गोरंबा घाटात अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महिंद्रा कंपनीची मॅक्स पिकअप गाडी सुमारे ७०० ते ८०० मीटर खोल दरीत कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला आणि पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.

केलापाणी, ता. धडगाव येथील चौधरी कुटुंबीयांनी गुरुवार दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी अक्कलकुवा येथून महिंद्रा कंपनीची (क्र.एफएच २० वाय ६७९७) मॅक्स पिकअप खरेदी केली. नंतर 4 वाजेदरम्यान ते आपल्या नातेवाइकांसह घरी केलापाणी येथे येत होते. नवीन वाहन खरेदीचा आनंद मात्र लगेचच विरला आणि हा अपघात घडला. खोल दरीतून मृतदेह बांबूच्या झोळीने वर आणण्यासाठी पोलिस व ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत परिश्रम घेत होते. प्राप्त माहितीनुसार गोरंबा घाटात एका अवघड वळणावर चालक सुनील दारासिंग चौधरी याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती खोल दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी खाली कोसळल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गाडी कोसळत असताना त्यातील प्रवासी बाहेर पडून फेकले गेल्याने त्यांना डोक्याला व छातीला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या. घर अगदी जवळ आले होते; परंतु तत्पूर्वीच हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त झाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्यास सुरुवात केली. बांबूंची झोळी करून मृतदेह व जखमींना केला पाणी येथे आणल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्यांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरी खोल असल्याने रस्त्यापर्यंत मृतदेह व जखमींना आणताना तासभर वेळ लागला. अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे व उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांनी भेट दिली.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांत कांतीलाल जेठ्या वसावे, रा. वाडीबार मोलगी, ता. अक्कलकुवा, साबलीबाई दारासिंग चौधरी, दारासिंग कुवरसिंग चौधरी, धीरसिंग पुन्या पाडवी, सर्व रा. केलापाणी, ता. धडगाव अशी मृतांची नावे आहेत. तर वाहनचालक सुनील दारासिंग चौधरी, गोविंद हूपसिंग वळवी हे दोघे जखमी असून म्हसावद ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी घडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT