नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरसह देशभरात वार्षिक उर्ससाठी प्रसिध्द ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमधील (ताजाबाद ट्रस्ट घोटाळा) कोट्यवधीच्या घोटाळा प्रकरणात अखेर रविवारी (दि.७) शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काँग्रेसचे माजी शहर व ट्रस्टचे माजी अध्यक्ष शेख हुसैन आणि ट्रस्टचे माजी सचिव इकबाल इस्माईल वेलजी यांना अटक केली. भाजपने कारवाईसाठी रेटा लावला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या अटकेमुळे राजकीयक्षेत्रात खळबळ माजली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक हुसेन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह टीकेने देखील वादग्रस्त ठरले होते. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या (ताजाबाद ट्रस्ट घोटाळा) अध्यक्ष आणि सचिव पदावर असताना १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत हुसैन यांनी सुमारे १.४८ कोटी ३७९ रुपये तर इकबाल वेलजी यांनी ११ लाख ५२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
शेख हुसैन व इकबाल इस्माईल वेलजी या दोघांवर कारवाईसाठी गेले अनेक दिवस राजकीयदृष्ट्या मागणी केली जात होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. यामध्ये हुसैन आणि वेलजी यांनी ट्रस्टचा पैसा ट्रस्टच्या खात्यामध्ये जमा करण्याऐवजी स्वत:च्या खासगी बँक खात्यात जमा केल्याचे उघड झाले. पुढे धर्मदाय आयुक्तांच्या निर्देशान्वये ताज अहमद अली सैयद यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सक्करदरा पोलिसांत गुन्हा दाखल होताच हुसैन व वेलजी यांनी सर्वोच्च न्यायालयात जमानत याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळत आरोपींना ट्रायल कोर्टात १४ दिवसांमध्ये हजर होण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारला १४ दिवस पूर्ण झाल्यामुळे दोन्ही आरोपी मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह सत्र न्यायालयात आले. यावेळी न्यायालयात तगडा बंदोबस्त होता. शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडून आरोपी शेख हुसैन व वेलजी यांना पोलिस कस्टडी रिमांडची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.
अधिक वाचा :