Latest

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्‍येष्‍ठ लेखक, कवी आणि समीक्षक नागनाथ कोतापल्ले (वय ७४) यांचे आज (दि.३०) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली.  त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

नागनाथ कोत्तापल्‍ले यांचा जन्‍म ९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. मराठवाडा विद्यापीठातून ते प्रथम क्रमांकाने बी.ए. आणि एम.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्‍हणून त्‍यांनी काम केले. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुखही होते. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

नागनाथ कोत्तापल्‍ले यांनी आपल्‍या कारकीर्दीत विपूल लिखाण केले. कृष्‍णमेघ, मूड्‍स, दारोबस्‍त लिंपुन घ्‍याव मेंदू हे कविता संग्रह. कर्फ्यू आणि इतर कथा, कवीची गोष्ट, गांधारीचे डोळे, देवाचे डोळे, पराभव, मध्यरात्र, रक्त आणि पाऊस, राजधानी, संदर्भ, सावित्रीचा निर्णय, उद्याच्या सुंदर दिवसांसाठी या कथा व कथासंग्रह. आधुनिक मराठी कविता: एक दृष्टिक्षेप, ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध, ज्योतिपर्व, दहा समीक्षक नवकथाकार शंकर पाटील, निवडक बी. रघुनाथ, साहित्याचा अन्वयार्थ, साहित्याचा अवकाश (समीक्षा) आदी समीक्षापर, पापुद्रे', 'ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध', 'नवकथाकार शंकर पाटील', साहित्याचा अन्वयार्थ', 'मराठी कविता : एक दृष्टिक्षेप', 'साहित्याचा अवकाश' (समीक्षात्मक) पुस्‍तकांचे त्‍यांनी लेखन केले.

साहित्‍य क्षेत्रातील अमूल्‍य योगदानाबद्‍दल त्‍यांना विविध पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले होते. यामध्‍ये यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१), बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५), महात्मा फुले पुरस्कार (१९९५), शिरीष गांधी साहित्य पुरस्कार.
पुणे नगर वाचन मंदिर, पुणे या संस्थेचा 'न.चिं. केळकर' पुरस्कार (२००९), बंधुता प्रतिष्ठान पुणेचा 'बंधुता' पुरस्कार (२००८)
माहुर येथील 'महाकवी विष्णूदास' पुरस्कार (२००९), नांदेड जि.प. चा नरहर कुरूंदकर पुरस्कार (२०१०) आदी पुरस्‍कारांचा समावेश आहे. मराठी भाषेतील ज्‍येष्‍ठ लेखक, कवी आणि समीक्षक अशी ओळख असणारे नागनाथ कोत्तापल्‍ले हे
२०१२ मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT