Latest

बाजार समिती निकाल : राहात्यामध्ये विखेच ! नेवासा, शेवगाव, अकोले मविआकडे

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सात बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले असून, राहात्याच्या सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तटबंदी कायम ठेवत सत्ता राखली. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरातांना प्रयत्न करूनही पदरी अपयश आले. नेवाशात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, तर शेवगावात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सत्ता राखली. अकोले बाजार समितीत सत्तांतर होऊन मविआने झेंडा फडकविला आहे.

जिल्ह्यात दोन टप्प्यांत 14 बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. शनिवारी पहिल्या टप्प्यात सात, तर दुसर्‍या टप्प्यातील सात बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी झाली. अपेक्षेप्रमाणे ज्याने त्याने आपापले गड राखले. राहाता येथे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पॅनल उभे करत भाजपचे मंत्री विखे पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे चित्र होते. निकालानंतर मात्र विखे पाटील यांनी राहाता बाजार समितीवर सर्वच 15 जागा जिंकत (पूर्वीच्या तीन बिनविरोध) एकहाती सत्ता मिळविली.
आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली मविआला भोपळाही फोडता आला नाही.

कोपरगावात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, राजेश परजणे आणि नितीन औताडे यांनी एकत्र येत बिनविरोधाचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे सेनेने पॅनल उभा करत, त्यांचा डाव उधळून लावला. मतदानानंतर मतमोजणीत ठाकरे सेनेला मतदारांनी नाकारत बाजार समितीची सत्ता कोल्हे-काळे-परजणे-औताडे यांना बहाल केली.

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या हातून बाजार समितीची सत्ता गेली. मविआने 11 जागा जिंकत बाजार समितीवर झेंडा फडकाविला आहे. पिचड पिता-पुत्राविरोधात राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीतराम गायकर यांच्या नेतृत्वात शिवसेना-काँग्रेस एकत्र आली होती. पिचड यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला अवघ्या सात जागा मिळाल्या. मविआने 11 जागा जिंकत बाजार समितीवर वर्चस्व मिळविले.

श्रीरामपुरात विखेंच्या नेतृत्वातील भाजप-करण ससाणे यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यात युती झाली. त्यांच्याविरोधात काँग्रेस आमदार लहू कानडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पॅनल उभा केला. मात्र, मतमोजणीत कानडे-आदिकांना मतदारांनी नाकारले. व्यापारी मतदारसंघात मात्र अपक्षाने बाजी मारली. 17 जागा जिंकत विखे-ससाणे-मुरकुटे युतीने बाजार समितीची सत्ता राखली.

शेवगावात माजी आमदार घुले यांनी सर्वच्या सर्व 18 जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवित बाजार समितीवर सत्ता मिळविली. नेवाशात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे- विठ्ठलराव लंघे यांनी पॅनल उभा करत आव्हान दिले. मात्र, नेवासेकरांनी मुरकुटे-लंघे यांना नाकारत सर्वच्या सर्व जागांवर गडाखांच्या उमेदवारांना विजयी कौल दिला.

जामखेडमध्ये कर्जतची पुनरावृत्ती

कर्जतपाठोपाठ जामखेड बाजार समितीमध्येही मतदारांनी भाजप आणि राष्ट्रवादीला समसमान कौल दिला. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे 9-9 उमेदवार निवडून आले. अखेरच्या क्षणी सत्तेची संदिग्धता मतदारांनी निर्माण केली. कर्जत आणि जामखेड या दोन्ही बाजार समिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात आहेत. तेथे भाजपने विधान परिषदेवर राम शिंदे यांना संधी दिल्यानंतर राजकीय गणिते बदलली आणि मतदारांनी दोघांनाही सत्तेचा समसमान कौल दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT