Latest

N. D. Mahanor | मराठी साहित्य प्रांताला उणीव जाणवत राहिल; ना. धों. महानोर यांना मान्यवर लेखकांची श्रद्धाजंली

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: ज्येष्ठ साहित्यिक आणि निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मराठी साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ना. धों. महानोर यांच्या जाण्याने मराठी साहित्य प्रांताला त्यांची उणीव जाणवत राहिल. त्यांच्या जाण्याने आपल्या वाट्याला एक प्रकारची उणीव निर्माण झाली (N.D.Mahanor) आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे.

श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ना. धों. महानोर यांच्या निधनावर म्हटले आहे की, कवी ना. धों. महानोर यांनी त्यांच्या कवितेने मराठी कवितेवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. कवी ना. धों. महानोर यांनी त्यांच्या कवितांनी मराठी भाषेतील कवितेवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. ही नुसतीच निसर्गकविता नाही तर ही पर्यावरणवादी कविता आहे. ते नुसते गाणेही नाही तर पर्यावरणीय प्रबोधन घडवण्याचे तसेच गीतातील, कवितेतील जानपद लोकलय जपण्याचेही मोठे कार्य महानोरांच्या कवितेसह त्यांच्या एकूणच कार्याने (N.D.Mahanor) केले आहे.

महानोर यांनी कादंबरी लेखन, लोककथांचे,लोकगीतांचे संपादन, समकालीन कवितांचे प्रातिनिधिक संपादन, विपुल मराठी चित्रपट गीत लेखन, इतर गद्यलेखनही त्यांनी भरपूर केले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवरचे अनेक पुरस्कार, मानसन्मान त्यांना लाभले आहे. विधान परिषदेवर ज्या अपवादात्मक नियुक्त्या प्रतिभावंतांच्या झाल्या त्यात दोनदा विधान परिषदेवर ते नियुक्त केले गेले होते. तिथेही त्यांनी त्यांची छाप उमटवली. आम्ही विदर्भ साहित्य संघाच्या वतीने घेतलेल्या पहिल्या व शेवटच्या अनियतकालिक विकास परिषदेसाठी महानोर आले होते. त्या परिषदेच्या शिफारशी त्यांनी विधान परिषदेत लावून धरल्या होत्या. परिणामी त्यावर शासनाने (N.D.Mahanor) दोनदा समित्याही नेमल्या, अशी आठवण देखील जोशी यांनी यावेळी सांगितली.

N. D. Mahanor : कवितेतून निसर्ग जगणारा कवी- ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे

दूरच्या रानाला,लागिर उन्हाला
पारंबीचा झुला गेला, झुलत नभाला….
ह्या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ओळी आज त्यांच्या देहरूप अस्तित्त्वानेच जणु नभाला पोहोचल्या आहेत. रान, मातीचा गंध ,शेतकऱ्याची दुःख ज्यांच्या कवितेत झिरपत राहिली. कवितेतून त्यांनी आपले आयुष्य पेरलं व ते सहा दशके बहरत राहिले. त्या भारतीय कविता समृद्ध करणाऱ्या, 'गुंतलेले प्राण हे रानात माझ्या….' ही त्यांची ओळ अहोरात्र जगणाऱ्या कविवर्य महानोर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! असे ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ छायाचित्रकार सुहास बहुलकर यांनी ना. धों. महानोर यांची ही आठवण

कवीवर्य महानोर यांची माझी भेट जळगाव येथील उद्योगपती भवरलाल जैन यांच्यामुळे झाली. भवरलाल जैन यांचे पोट्रेट मी केले होते. ते पोर्ट्रेट भव्य आकाराचे व संकल्पनात्मक होते. ते स्वतः भवरलाल जैन यांना कमालीचे आवडल्यामुळे त्यांनी ते बघायला जळगाव येथील अनेकांना आमंत्रित केले. त्यात कविवर्य महानोर देखील होते. त्या चित्रात मी भवरलाल यांचे गाव अजिंठ्यामुळे जवळ असल्यामुळे त्यात अजिंठ्यातील चित्रांचा अंतर्भाव केला होता. महानोर यांना ती कल्पना व ती ज्या प्रकारे साकार केली होती ते अतिशय आवडले. त्याचे त्यांनी रसग्रहणासकट कौतुक केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी मला आमंत्रित केले, त्यांच्या कवितेचे पुस्तक भेट दिले. त्या क्षणी मला त्यांचेही पोर्ट्रेट करायची इच्छा झाली. पण लगेचच माझी गाडी होती त्यामुळे मला निघावे लागले.त्यानंतर पुन्हा महानोर यांच्या भेटीचा आणि त्यांचे चित्र काढण्याचा योग आलाच नाही. या श्रेष्ठ निसर्ग कवीला मनःपूर्वक आदरांजली! निसर्गकवी महानोर यांची गोड आठवण ज्येष्ठ छायाचित्रकार सुहास बहुलकर यांनी याप्रसंगी सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT