Latest

Muslim Women : मुस्लिम महिला मशिदीत नमाजपठण करू शकतात, पण पुरुषांसोबत नाही

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम महिला मशिदीत नमाजपठण करू शकतात. इस्लाममध्ये महिलांना मशिदीत नमाज पठणावर बंदी नाही. पण त्यांना पुरुषांसोबत एकत्र नमाजपठण न करता निर्धारित स्वतंत्र जागी नमाज अदा करता येईल, असे शपथपत्र ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले.

पुण्यातील अ‍ॅड. फरहा अन्वर हुसेन शेख यांनी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात एका याचिका दाखल करून महिलांना मशिदीत प्रवेश करण्यावर घालण्यात आलेली बंदी अवैध घोषित करण्याची मागणी केली होती. त्यांनी याचिकेत म्हटले होते की, महिला मशिदीत जाऊ शकत नाहीत, असे पवित्र ग्रंथ कुराणात म्हटलेले नाही. त्यामुळे महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास लादण्यात आलेली मनाई मुस्लिम महिलांच्या घटनादत्त अधिकारांचे उल्लंघन आहे व सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचेही हनन आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ अ‍ॅड. फरहा यांनी मक्का व मदिना येथे महिला यात्रेकरू आपल्या परिवारातील पुरुषांसह हज आणि उमरा करतात असा दाखला दिला होता.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, गुरुवारी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने शपथपत्र सादर केले. त्यात म्हटले आहे की, नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जावे की न जावे हे ठरवणे महिलांचा अधिकार आहे. मुस्लिम महिलांना पाच वेळच्या नमाज किंवा शुक्रवारच्या सामुहिक नमाजमध्ये सहभागी होण्याचे बंधन नाही. त्या घरी किंवा मशिदीत कोठेही नमाजपठण करू शकतात. पुरुषांसाठी मात्र मशिदीतच नमाजपठण करण्याचा नियम आहे.

बोर्डाने अ‍ॅड. फरहा यांचा युक्तिवाद फेटाळताना म्हटले आहे की, मक्का किंवा मदिना येथे पुरुष आणि महिला यांना नमाजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. इस्लामी धर्मग्रंथांत महिला व पुरुषांबाबतचे नियम धार्मिक गरजेपोटी करण्यात आले आहेत, ते नाकारता येणार नाहीत. त्यामुळे येथेही मशिदींमध्ये महिला नमाजपठण करू शकतात, पण त्यांना पुरुषांसोबत नमाज पठण करता येणार नाही, त्यांना स्वतंत्र नमाज अदा करावी लागेल. आगामी काळात नव्या मशिदी बांधताना पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र विभाग करण्याची सूचना बोर्ड निश्चीत करेल असेही शपथपत्रात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT