समीर हुसेन संदे कुटूंब 
Latest

अख्खी फॅमिलीच लै जबराट हाय! घरी गणपती पुजणाऱ्या मुस्लीम भाईसाठी किरण मानेंची खास पोस्ट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपले सर्वच सण-उत्सव सर्वांना एकत्र आणणारे असतात. त्या-त्या धर्मातील सण-उत्सव, परंपरा, रितीरिवाजाचे आदर करत सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. सण साजरे करताना कोणताही धर्म आडवा येत नाही. सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. या उत्सवातदेखील सर्वजण सहभागी होतात. आता अभिनेते किरण माने यांनी अशा एका चाहत्याच्या कुटुंबीयांबद्दल लिहिले आहे, जे मुस्लिम बांधव असूनदेखील गणेशाला मनोभावे पूजतात. किरण माने यांनी फेसबूक पोस्ट लिहून काय म्हटलंय पाहा-

जनाब समीर हुसेन संदे या मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाचा फोटो बघून लै लै लै भारी वाटलं भावांनो ! समीरभाई माझे फॅन असल्याचा अभिमान वाटला. कारन हे हायेत आपले खरे संस्कार… आन् हीच हाय आपल्या संविधानातली 'बंधुता' !

रेठरे बुद्रूक गांवातला आमचा समीरभाई म्हन्जे कवीमनाचा संवेदनशील मानूस. ज्या भक्तीभावानं तो अल्लाहची इबादत करतो, तेवढीच अदब तो गणपतीची पूजा करतानाबी ठेवतो. रमज़ानमध्ये रोज़ा ठेवन्यासोबतच नवरात्रीत उपास करनं हा बी आपला 'फ़र्ज़' मानतो. अशा नादखुळा मानसाचा 'ज़मीर' किती निर्मळ, नितळ आसंल गड्याहो !

ही अख्खी फॅमिलीच लै लै लै जबराट हाय. समीरभाईचे वडिल पै. हुसेनभाई यांच्या जोपर्यन्त जीवात जीव होता… पाय साथ देत होते… तोपर्यन्त किल्ले मच्छिन्द्रगडवरची मच्छिन्द्रनाथाची दर रविवारची पहाटेची आरती त्यांनी कधी चुकवली नाय !

मला राहून-राहून वाटतं रेठरे बुद्रुक गांवाला 'मानवता जपनारं लोभस गांव' म्हनून पुरस्कारच देऊन टाकावा. अहो, खरंच या गांवाचे एकेक किस्से म्हन्जे द्वेषाचं विष पसरवू पहानार्‍यांना सन्नकन् कानाखाली हानल्यागत हाय. रेठऱ्याच्या जोतिबाची पालखी दरवर्षी दसऱ्याच्या जागराला निघते. या पालखीचा मान आजबी मुस्लिम समाजाला हाय ! रेठऱ्यात रहिमतबुवा आन् पीर साहब यांच्या दोन छोट्या दर्गा हायेत. तिथं हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेनं चादर चढवताना आन् दुवा मागताना दिसतात.

याच रेठर्‍यातले गनीभाई, ज्यांना 'प्यारन भाभीचा गनी' म्हनायचे, ते एकतारी भजनातले 'नुसरत फ़तेह अली ख़ान' होते. अशा खनखनीत आवाजात पांडुरंगाला साद घालायचे की साक्षात इठूराया भजनात यिवून नाचून जात आसंल! त्यांचेच जिगरी दोस्त, रेठर्‍याचेच रामभाऊ सातपुते दरवर्षी न चुकता रमज़ानच्या महिन्यात रोज़े धरत. रेठऱ्यात मानाचे तीन गणपती असतात. त्या गणपतींचा आगमन व पालखीचा मान 'नाभिक' समाजाला देन्याची परंपरा पूर्वीपास्नं चालत आलेली हाय.

अजून काय सांगू? आज मानसामानसात फूट पाडू पहानार्‍या काळात, प्रेमाचा संदेश देनारं रेठरे बुद्रुक हे गांव महाराष्ट्रात आदर्श ठरावं असं हाय. रेठर्‍याच्या मातीतल्या माझ्या बांधवांना कळलंय, कृष्णामाईचं पानीबी तहान भागवताना कधी भेदभाव करत नाय… आन् चौकातलं वडाचं झाडबी सावली देताना जातधर्म बघून देत नाय. भेदाभेद आन् द्वेष हे रिकाम्या टाळक्यांनी उकरून काढलेले धंदे हायेत.
म्हनूनच अकबर इलाहाबादी म्हनायचा,

"मज़हबी बहस मैंने की ही नहीं
'फ़ालतू अक़्ल' मुझ में थी ही नहीं !"
– किरण माने.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT