दोडामार्ग (सिंधुदुर्ग); पुढारी वृत्तसेवा : पत्नीने दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवू नये, याबाबत वारंवार समजावून देखील पत्नी ऐकत नसल्याने पतीने रागाच्या भरात त्याच्या साथीदाराच्या मदतीने ओढणीने पत्नीचा गळा आवळून खून केला. घोटगेवाडी भटवाडी येथील पुलाखाली पत्नीचा मृतदेह टाकून मृताची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१०) रात्री ९ वा. च्या सुमारास उघडकीस आली आहे. विशिता विनोद नाईक (३० वर्षे, रा. वास्को गोवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पती विनोद मनोहर नाईक (४० वर्षे, मूळ रा. बेलबाय, वास्को व सध्या रा. पिंटो अपार्टमेंट, म्हापसा-गोवा) व त्याचा साथीदार ऋतुराज श्रावण इंगवले (२५ वर्षे, मूळ रा. चंदगड, जिल्हा कोल्हापूर व सध्या रा. चारीवाडी, म्हापसा) या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या घटनेने दोडामार्ग तालुका हादरला आहे. विशेष म्हणजे दोडामार्ग पोलिसांनी अवघ्या पाच तासातच आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
भटवाडी येथील एक पुरोहित हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या गुरांना घेऊन नदीवर पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी तेथील सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांना दिली. मायकल लोबो यांनी ही माहिती पोलीस पाटील रामचंद्र लक्ष्मण नाईक यांना दिली. त्यांनी याबाबत दोडामार्ग पोलिसांना याबाबत कळविले. लागलीच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, रामचंद्र मळगावकर, अनिल पाटील, संजय गवस, बाबी देसाई, दीपक सुतार, तनुजा हरमलकर, होमगार्ड बाळकृष्ण जाधव घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, प्रविण गवस, पीकू कवठणकर यांनी पोलिसांना मदत केली.
विनोद व विशिता यांचे २०१५ सालात लग्न झाले होते. मात्र विशिताच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती दाखल झाल्याने २०२० सालापासून ती त्याच्यासोबत राहायची. असे असताना देखील ती अधून मधून पती विनोद यास भेटायची. दरम्यान त्यांची ही गाठभेट एका हॉटेलमध्ये व्हायची. मागील तीन वर्षापासून पती-पत्नीचे असेच चालू होते. यावेळी विनोद हा पत्नी विशिताची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा. मात्र विशिताने याकडे कायम दुर्लक्ष केले. सोमवारी या पती-पत्नीमध्ये पुन्हा भेटण्याचे ठरले आणि ठरल्याप्रमाणे ते एका हॉटेलमध्ये भेटले. यावेळी विनोदने विशिताला बाहेर जेवायला जाऊया असे सांगितले. विशितानेही त्याला होकार दिला आणि दोघेही कारने दोडामार्ग मधील एका हॉटेलमध्ये जेवायला आले. यावेळी कारचालक म्हणून त्यांच्यासोबत विनोदचा साथीदार ऋतुराज इंगवले हा देखील होता. जेवणाचा बेत आटोपताच विनोदने विशिताला सांगितले की माझा एक मित्र मला पैसे देणार आहे, त्यामुळे ते आणायला जाऊया. विशिताने संमती देताच या प्रवासादरम्यान विनोद विशिताला समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
भांडणाचे रुपांतर खुनात
विशिता ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्यामुळे या दोघांच्यात जोरदार भांडणे झाली. यावेळी विनोदचा राग अनावर झाला आणि त्याने साथीदार ऋषिकेश याच्या मदतीने भटवाडी येथील पुलावर विशिताच्या ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांनी तो मृतदेह तेथील पुलाच्या खाली डाव्या बाजूला आणून फेकण्याचा प्रयत्न केला. महिलेची शरीरयष्टी मोठी असल्यामुळे त्यांनी मृतदेह ओढत नेऊन पुलाच्या उजव्या बाजूला नेऊन टाकला. मृतदेह ओढत नेताण्याच्या खुणा घटनास्थळावर आढळून आल्या. शिवाय त्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचला आणि रक्ताचे शिंतवडे उडालेला दगड तेथेच टाकून त्यांनी पलायन केले. विनोद व विशिताला सहा वर्षांची एक मुलगी आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक दाखल
या घटनेची माहिती सावंतवाडी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंकी यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व घटना स्थळाची पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही दाखल झाले. यात पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांसह रवी इंगळे, श्री. केसरकर आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.
अवघ्या पाच तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या
मंगळवारी रात्री ९ वा. च्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून आरोपीचा शोध घेऊ लागले. यावेळी प्रथम त्यांनी जवळील पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आहे का? याबाबत शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच मृतदेहावरील कपडे व चपला हे फॅन्सी असल्याने हा मृतदेह तालुक्यातील नसावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावत थेट म्हापसा पोलीस ठाणे गाठले. तेथे जाऊन महिला हरवल्याची तक्रार आहे की नाही? याची पडताळणी केली असता विशीता नाईक ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिचा फोटो व फोटोत असलेले शरीरावरील कपडे याची पडताळणी केली असता ते मृतदेहाशी मिळते असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी पती विनोद यास चौकशीसाठी बोलावून घेत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विनोदने देत असलेल्या माहितीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली व यात आपल्याला ऋषिकेश इंगवले यानेही मदत केल्याचे पोलिसांना सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, रामचंद्र मळगावकर, अनिल पाटील, संजय गवस यांनी या कामी विशेष मेहनत घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.
अधिक वाचा :