Latest

मुंबई वार्तापत्र : सत्ता मग्‍न राजा, तळमळे अवघी प्रजा!

backup backup

मुंबई वार्तापत्र : आधीच कोरोना काळात संसाराचे गाडे ओढताना त्रस्त आलेली जनता आता हळूहळू सावरू पाहतेय. तिच्या हातात हात द्यायचा की, पायात पाय घालून आणखी त्रासात टाकायचे, याचा निर्णय राज्यकर्त्यांनी आता समजदारीने घ्यायला हवा.

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला, नंतर आजपर्यंत बरीच वर्षे त्याच काँग्रेससोबत सत्तेचा संसार थाटला. मात्र, तरीही काँग्रेसमधून आपल्याला बाहेर पडावे लागले याची सल त्यांच्या मनातून जात नसावी. त्यामुळेच मधूनमधून त्यांना त्या पक्षाची खोड काढायची तलफ येतेच! आताही त्यांनी अशीच खोड काढली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. '

रया गेलेल्या हवेलीत राहणार्‍या जमीनदारासारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे, असे नामधारी जमीनदार उत्तरप्रदेशात आजही आढळतात. अशा हवेलीचा जमीनदार रोज सकाळी उठून आजूबाजूचे हिरवेगार शिवार पाहून म्हणतो, 'हे सगळे माझे होते; पण आता नाही!' उत्तर प्रदेशमध्ये असे अनेक जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती होती. लँड सिलिंगचा कायदा आला आणि हजारो एकरची ही शेती पार पंधरा-वीस एकरांवर आली. गावामध्ये असलेल्या भल्या मोठ्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकददेखील त्या जमीनदारांमध्ये उरली नाही, असेही पवार म्हणाले. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे, याकडे लक्ष वेधले असता, 'काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत नसतात,' असेही पवारांनी नमूद केले.

मुंबई वार्तापत्र :

पश्‍चिम बंगालमध्ये मध्यंतरी ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर सर्व विरोधी पक्षांनी भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र यावे अशी मोहीम सुरू झाली. मात्र, या एकजुटीचे नेतृत्व कुणी करावे, यावरून धूसफूस सुरू होती. मोदींसमोर पंतप्रधानपदासाठी पर्याय कोण असावा, यावर खल झाला. काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे नाव पुढे येताच बाकीचे पक्ष मागे सरकले आणि ही एकजूट सुरू होताच बाजूला पडली. शरद पवार यांची यात कळीची भूमिका होती. कारण, पवारांनी नेतृत्व करावे, असा आग्रह शिवसेनेने धरला. पवार यांचे काँग्रेसशी असलेले नाते म्हणजे 'तुझे नि माझे जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना,' असे आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेला आता 22 वर्षे झाली.

स्थापनेपासून आजतागायत काँग्रेसच्या कुबड्यांशिवाय स्वबळावर पवार राज्यात सत्तास्थापन करू शकले नाहीत. तरी काँग्रेसला हिणवणारी वक्‍तव्ये ते करत असतात. त्यात तथ्यही असल्याने केवळ चडफडण्यापलीकडे काँग्रेस नेते काहीही करू शकत नाहीत. आताही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वगळता पक्षाच्या अन्य कुठल्याही नेत्याने जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. नाना पटोलेंनी मात्र खास विदर्भाचा ठसका असलेल्या तिखट शब्दांत शरद पवारांना सुनावले. काँग्रेसने कधी जमीनदारी केली नाही. उलट अनेक लोकांना जमीन राखायला दिली, त्यांना ताकद दिली, पण त्यांनीच काँग्रेसचा घात केला. राखणदारांनीच जमीन चोरली, डाका घातला. त्यामुळे ही परिस्थिती झाली, असे पवार यांना म्हणायचे असेल, असा टोमणा पटोले यांनी मारला. गंमत म्हणजे 2024 नंतर देशात काँग्रेसचा पंतप्रधान बनेल हे निश्‍चित आहे, असे सांगत पवारांनी दिलेले उदाहरण कसे योग्य आहे, हेच पटोलेंनी दाखवून दिले!

आता शरद पवार आणि काँग्रेस यांच्यात अशी पुन्हा एकदा जुंपण्यात शक्यता निर्माण झाली असताना त्यात उडी घेऊन आणखी काडी लावली नाही, तर तो भाजप कसला? काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वर्‍हाडात असे म्हणतात की, मालगुजरी तर गेली; पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे, असा चिमटा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आणि पवार यांच्या वक्‍तव्याला पाठिंबाच दिला.

पवारांनी काँग्रेसवर अशी टोलेबाजी पहिल्यांदाच केली असे नाही, मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय नेते यावर मूग गिळून गप्प आहेत. कदाचित काहीच हाती नसण्यापेक्षा आता महाराष्ट्रात सत्तेत भागीदारी आहे, ती का सोडा! असा विचार झाला असावा. एक मात्र खरे की, या सरकारमध्ये तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आहेत. तशी वेळ आली, तर आपले दात दाखवायला काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही, हे नक्की!

कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे दिसत असताना आता तिसरी लाट येऊ घातली आहे. त्यामुळेच अजूनही देवालये उघडलेली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार पुढच्या धोक्याची जाणीव करून देत आहेत. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हिंदुत्वाची कास सोडल्याची टीका भाजपकडून सातत्याने केली जात आहे. ही टीका सहन करीत उद्धव ठाकरे यांनी अजूनही सार्वजनिक उत्सव आणि देवस्थाने बंदच ठेवली आहेत.

मुंबई वार्तापत्र : भाजपच्या आंदोलनांना सरकारने दाद न देता अजून देवालये आणि धार्मिक उत्सवांवरची बंदी उठवलेली नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. त्यात तथ्य असेलही; पण मग राजकीय पुढार्‍यांचे वाढदिवस, त्यांच्या घरची लग्नकार्ये, पक्षांचे मेळावे आणि यात्रा-मिरवणुका सुखेनैव सुरू आहेत, याला काय म्हणायचे? शासकीय कार्यक्रमांनाही मोठी गर्दी होते आणि ती होऊ दिली जाते, हे कसे? सर्वसामान्यांना जे नियम आहेत तेच पुढार्‍यांना लागू का होत नाहीत? त्यांच्याविरोधात गुन्हे का नोंदवले जात नाहीत? त्यांची उत्तरे कोण देणार? राजकीय नेत्यांनी नियमांची पायमल्ली करायची आणि सामान्यांनी ते केले, तर मात्र

त्यावर कारवाईचा बडगा उगारायचा, असे कसे चालेल? एकतर आपत्ती व्यवस्थापन एखाद्या समजदार नेत्याच्या हाती सोपवायला हवे. आधीच कोरोनाकाळात संसाराचे गाडे ओढताना त्रस्त झालेली जनता आता हळूहळू सावरू पाहतेय, तिच्या हातात हात द्यायचा की तिच्या पायात पाय घालून आणखी त्रासात टाकायचे, याचा निर्णय राज्यकर्त्यांनी समजदारीने घ्यायला हवा. नाहीतर एका जुन्या संगीत नाटकातल्या पदाच्या या ओळी आजही तंतोतंत लागू होतील.

तळमळे अवघी प्रजा । उत्सवी (सत्ता) मग्‍न राजा।
साधितो शकुनी काजा । वैरी घर भरिती, स्वैरगती रमती । प्रजा जन फिरती रानी ॥
जनतेची अवस्था अशी होऊ देऊ नका, एवढीच विनंती मायबाप सरकारला आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT