Latest

समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस-वे

Arun Patil

कुडाळ / सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : कोकणचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. या सरकारच्या माध्यमातून अनेक जनहितार्थ निर्णय घेतले जात आहेत. जगाला हेवा वाटेल असाच कोकणचा विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे करणार तसेच सावंतवाडीच्या विकासासाठी 110 कोटींचा घसघशीत निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ आणि सावंतवाडी येथील कार्यक्रमात जाहीर केला. सावंतवाडीतील कार्यक्रमात त्यांनी स्वतंत्र कोकण पर्यटन महामंडळाबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितलेे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते.

कुडाळ हायस्कूल मैदानावर 'शासन आपल्या दारी, योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी' कार्यक्रम झाला. ना. शिंदे म्हणाले, सिंधुदुर्ग या छोट्याशा जिल्ह्यात 50 हजार लाभार्थी एकत्र आणण्याची जादू प्रशासनाने केली, हे विशेष आहे. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही संकल्पना आम्ही मोडीत काढली. आजच्या व्यासपीठावर लाभार्थीसुद्धा बसले आहेत. हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. गेल्या 10-11 महिन्यांत 679 कोटी रुपयांच्या योजनांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यापूर्वी मागील अडीच वर्षांत काय झालं? त्याबाबत मी जास्त बोलत नाही, असे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. कायदे, नियम हे लोकांना न्याय देण्यासाठी असतात हे आम्ही नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कृतीतून पाहिले आहे, अशा शब्दांत त्यांनी ना. नारायण राणेंचे कौतुक केले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कोकणातील 19 रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोकणातील सर्व रस्त्यांची कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत. रोजगाराच्या द़ृष्टीने मुख्यमंत्र्यांनी मोठे पॅकेज या जिल्ह्याला जाहीर करावे, अशी विनंती ना.चव्हाण यांनी केली.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील उद्योग बाहेर गेल्याचा अपप्रचार विरोधक करतात. मात्र देशपातळीवर झालेल्या सर्व्हेत महाराष्ट्र राज्य उद्योग जगतात एक नंबरवर आहे. व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा

* स्वतंत्र पर्यटन महामंडळाची स्थापना करणार
* चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देणार
* आंबोली हिलस्टेशन बनविणार
* राज्यात तीन क्रीडा संकुले उभारणार

मुख्यमंत्र्यांनी साधला मालवणीतून संवाद

* तुमका बघून माका आनंद झालो, तुम्ही कसे आहात? बरे आसात मा? असा मालवणी भाषेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

पंतप्रधान लवकरच सिंधुदुर्गात!

* छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सर्वत्र साजरा करण्यात येत असतानाच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ला व विजयदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने त्यांचे सिंधुदुर्गात जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT