Latest

MI vs GT : मुंबईचा गुजरातवर २७ धावांनी विजय

Shambhuraj Pachindre

मुंबई; वृत्तसंस्था : सूर्यकुमार यादव… मिस्टर 360 नावाने नावाने ओळखला जाणारा मुंबईकर पुन्हा एकदा पेटून उठला. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने केलेल्या वादळी शतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने गुजरातविरुद्ध 5 बाद 218 धावा केल्या. सूर्याने 49 चेंडूंत नाबाद 103 धावा करताना 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. सूर्यकुमारचे आयपीएलमधील हे पहिलेच शतक ठरले. त्याच्या या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर 27 धावांनी विजय मिळवला. मुंबईने गुजरातची अवस्था 8 बाद 103 अशी केली होती, यावेळी मुंबई मोठा विजय मिळवणार असे वाटत असताना रशिद खान नडला. त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 32 चेंडूत 79 धावा केल्या. त्यामुळे मुंबईच्या विजयाचे मार्जिन कमी झाले. रशिदने आपल्या खेळीत 3 चौकार आणि तब्बल 10 षटकार ठोकले. (MI vs GT)

मुंबईच्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात जायंटसचे वृद्धिमान साहा (2), कर्णधार हार्दिक पंड्या (4) आणि शुभमन गिल (6) हे तीन खंदे शिलेदार 26 धावांत तंबूत परतल्याने गुजरातच्या पराभवाची पायाभरणी झाली होती. आकाश मढवाल याने साहा आणि गिल यांना तर बेहरेनडॉर्फने पंड्याला बाद केले. यानंतर पॉवर प्ले संपल्याबरोबर विजय शंकरचा पॉवरफुल प्ले पियुष चावला याने संपुष्टात आणला. शंकरने 14 चेंडूंत 29 धावा केल्या. पाठोपाठ अभिनव मनोहर (2) बाद झाला. संघाने शतक साजरे केले आणि डेव्हीड मिलर (41) बाद झाला. पियुष चावलाने राहुल तेवटीयाला (14) बाद केले.

आठव्या गड्याच्या रूपाने नूर अहमद बाद झाला. यावेळी गुजरातची धावसंख्या होती 8 बाद 103. मुंबईच्या विजयाची औपचारिकता शिल्लक आहे असे वाटू लागले. मुंबई मोठा विजय मिळवणार आणि रनरेटमध्ये चांगला फायदा होणार याचे गणित मांडण्यात चाहते व्यस्त होते. पण.. पण.. पण… येथून पुढे वानखेडेवर अवतरलं रशिद खानचे वादळ. गोलंदाजीत चार मुंबईकरांचा बळी घेणारा रशिदसाठी आजचा दिवसच स्पेशल होता. रशिदने आल्यापासून धुपाटणे सुरू केले. वानखेडेवर पुन्हा चौकार-षटकारांची बरसात सुरू झाली. बघता बघता त्याने अर्धशतकही गाठले.

त्यासाठी त्याला 21 चेंडू पुरले. त्यानंतर तो जास्तच आक्रमक झाला. विजय टप्प्याच्या बाहेर होता, सामना गुजरातने गमावला होता, त्यामुळे रशिदने येईल त्या चेंडूवर प्रहार करणे सुरू ठेवले. शेवटच्या षटकांत तर त्याने सलग तीन षटकार ठोकले. त्याचा रुद्रावतार पाहता तो सलग सहा षटकार मारतो की काय अशी भीती मुंबईकरांना वाटू लागली, पण हा विक्रम हुकला. तो 32 चेंडूत 79 धावा करून नाबाद राहिला. आवश्यक धावांची संख्या जर कमी असती तर रशिदने नक्कीच सामन्याचे चित्र पालटवले असते. पण शेवटी मुंबईने 27 धावांनी विजय साजरा केला.

तत्पूर्वी, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये दमदार सुरुवात केली. गेल्या काही सामन्यांपासून दुहेरी आकडाही न गाठू शकणार्‍या रोहित शर्माने अखेर आपला जुना खेळ दाखवण्यास सुरुवात केली. इशान किशन आणि रोहित शर्माने चौथ्या-पाचव्या षटकातच मुंबईला अर्धशतकी मजल मारून दिली. मुंबईने 6 षटकांत बिनबाद 61 धावांपर्यंत मजल मारली. पॉवर प्लेनंतर मात्र मुंबईची पॉवर संपल्यासारखी परिस्थिती झाली. राशिद खानने रोहित शर्माला 29 धावांवर बाद केले. त्यानंतर इशान किशनची 20 चेंडूतील 31 धावांची खेळी देखील संपवली. यानंतर नेहल वधेराला 15 धावांवर बाद करत मुंबईची अवस्था 3 बाद 88 अशी केली.

पण यानंतर सुरू झाले सूर्यकुमारचे तांडव. मुंबईचा सूर्या मैदानात आला आणि त्याने वानखेडे हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्याने एकहाती किल्ला लढवत 49 चेंडूत शतकी तडाखा दिला. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईना 20 षटकांत 5 बाद 218 धावांपर्यंत पोहोचवले.

सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. सूर्याचे हे आयपीएलमधील पहिले शतक ठरले. गुजरात टायटन्सच्या राशिद खानने 30 धावांत 4 विकेट घेतल्या; पण इतर गोलंदाजांना मुंबईकर फलंदाजांनी धू धू धुतलेे.

हेही वााचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT