मुंबई इंडियन्सचा तब्बल दहा वर्षांचा कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यावरचा मुकुट काढून संघव्यवस्थापनाने तो हार्दिक पंड्याच्या डोक्यावर चढवला. हार्दिक पंड्या गुणवान अष्टपैलू खेळाडू असला, तरी तो रोहित शर्मासारखा अनुभवी, लोकप्रिय, यशस्वी कर्णधार नाही. यामुळे तो प्रेक्षकांचा लाडका होण्यास वेळ लागेल; पण या बदलाची कारणे काय असू शकतील..?
आयपीएलचा नवा हंगाम चालू झाला तो दोन मोठ्या संघांच्या नव्या कर्णधारांच्या नियुक्तीने. चेन्नई सुपर किंग्जचा आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा मुकुट आपणहून उतरवून ऋतुराज गायकवाडच्या डोक्यावर चढवला, तर मुंबई इंडियन्सचा तब्बल दहा वर्षांचा कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यावरचा मुकुट काढून संघव्यवस्थापनाने हार्दिक पंड्याच्या डोक्यावर चढवला. दोन्ही बदल त्या त्या संघांच्या चाहत्यांना पचवणे जड जात आहेत; पण चेन्नईच्या बाबतीत हा महेंद्रसिंग धोनीचा निर्णय असल्याने आणि त्यानेच गायकवाडचे नाव सुचवल्याने हा बदल चेन्नईचे चाहते पचवत आहेत. अजूनही धोनी मैदानात उतरला की, देव बघितल्यासारखे ते हरखून जातात; पण गायकवाडला गादीचा वारस म्हणून त्यांनी मान्य केले आहे.
मुंबई इंडियन्सचे मात्र तसे नाही. मुंबईच्या संघाची नेतृत्वाची धुरा ही संघमालकांनी हार्दिक पंड्याच्या हातात सोपवली. हे करताना पंड्याला गुजरातकडून तडकाफडकी ट्रेड ऑफ करणे आणि थेट कर्णधार बनवताना संघमालकांनी या प्रक्रियेची कारणे आणि माहिती उघड केली नाही. यामुळे अर्थातच हा बदल चाहत्यांना आवडला नाही. ज्या मुंबईच्या लाडक्या रोहित शर्माने 10 वेळा कर्णधार असताना तब्बल पाचवेळा मुंबईला अजिंक्यपद मिळवून दिले आहे, त्याला कर्णधारपदावरून का दूर करावे? भारताचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला नेतृत्वाचा अनुभव उत्तम असताना संघव्यवस्थापनाने पंड्यात असे काय विशेष पाहिले? या सर्व प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने याचा रोष सहन करावा लागत आहे तो हार्दिक पंड्याला.
मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत तीन सामने झाले; पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संघाविरुद्ध हार्दिक पंड्याला प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागत आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावरच्या पहिल्या सामन्यात पंड्या नाणेफेकीसाठी आलेला मोठ्या स्क्रीनवर बघून प्रेक्षकांनी त्याची इतकी हुर्यो उडवली की, नाणेफेकीचा समालोचक संजय मांजरेकरला प्रेक्षकांना शांत राहायचे आवाहन करावे लागले. या सर्व प्रकारात हार्दिक पंड्याची काय चूक आहे? खरं तर काहीच नाही. जसं एखाद्या कंपनीत एक उत्तम मॅनेजर असतो; पण व्यवस्थापन कुणा दुसर्या होतकरू गुणी खेळाडूला प्रमोशन देते आणि तो ते स्वीकारतो तसेच मुंबई इंडियन्सच्या संघव्यवस्थापनाने दिलेले प्रमोशन हार्दिक पंड्याने स्वीकारले. या सर्व प्रकारात मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने जरा त्यांच्या प्रामाणिक प्रेक्षकांना योग्यवेळी या बदलाची माहिती दिली असती, तर कदाचित हे घडले नसते.
जगातील बहुतांशी विवाद हे फक्त संवादाच्या अभावामुळे होतात. त्यातलाच हा एक प्रकार. हा बदल जेव्हा लोकांच्या पचनी पडला नाही हे लक्षात आले तेव्हा मुंबई इंडियन्सने हे सर्व रोहित शर्माला विचारात घेऊन आणि त्याच्या संमतीने केले हे जाहीर करायची सारवासारव केली; पण त्याला उशीर झाला होता. चाहत्यांच्या मते, ही रोहित शर्माची उचलबांगडीच होती. वास्तविक, फ्रँचायझी संघात संघमालक आणि संघव्यवस्थापन यांचे अधिकार सर्वोच्च असतात; पण ते अधिकार वापरून हा बदल झाला का, कुठच्या क्रिकेटच्या कारणासाठी हा बदल झाला हे मुंबई इंडियन्सकडून जाहीर न झाल्याने चाहत्यांत प्रचंड नाराजी पसरली. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा लाडका कर्णधार आहे, भारताचा कर्णधार म्हणूनही त्याने त्याच्या वेगळ्या हाताळणीने छाप पाडली आहे.
धोनीनंतर कुठच्याच कर्णधाराने आयसीसी स्पर्धा जिंकली नाही, तेव्हा तो मुद्दा बाजूला ठेवला तर रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांत काही कमी नाही, ज्यामुळे त्याला हे कर्णधारपद गमवावे लागले. याउलट हार्दिक पंड्या जरी 2015 सालापासून भारताचा एक उत्तम अष्टपैलू म्हणून नावारूपास आला, तरी तो कायम दुखापतीच्या भोवर्यात अडकलेला असतो आणि त्याच्या वृत्तीमुळे अकारण वादात असतो. क्रिकेटपटू बाहेर काय करतात, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण आज आपल्या देशात अनेक युवक या क्रिकेटपटूंना आदर्श किंवा देव मानून चालतात. आपल्या बेफिकिरीच्या वेस्ट इंडियन स्टाईल मनोवृत्तीचे रूप आपल्या खासगी आयुष्यात कसे आहे, याची मुक्ताफळे त्याने 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात उधळल्यावर अनेक क्रीडा रसिकांच्या मनातून तो उतरला होता; पण पुन्हा त्याच्या मैदानावरील कामगिरीने त्याने चाहत्यांना आपलेसे केले. क्रिकेटपटूला टीकाकारांची तोंडे बंद करायला एकच मार्ग असतो, तो म्हणजे मैदानावरील कामगिरीचा; पण या कामगिरीत सातत्य राखायला त्याच्या दुखापती आडव्या येत आहेत.
हार्दिक पंड्या ऐन विश्वचषकात बांगला देशविरुद्धच्या सामन्यात पायाला दुखापत होऊन बाहेर गेला तो उगवला थेट चार महिन्यांनी आयपीएलमध्ये. तेव्हा पहिला प्रश्न पडतो तो चार महिन्यांनी मैदानात उतरण्यापूर्वी त्याला स्थानिक क्रिकेट खेळणे आवश्यक वाटले नाही? बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट खेळायला खेळाडूंना सक्ती केली, तरी पंड्याची शरीररचना लाल चेंडूच्या जास्त दिवसांच्या क्रिकेटमध्ये खेळायला अजून योग्य नाही म्हणून त्याला सूट दिली. ईशान किशनने मात्र बोर्डाची रणजी खेळायची सूचना धुडकावल्यावर तो पंड्याबरोबर बडोद्यात सराव करताना दिसला. यात पंड्याची पुन्हा काही चूक नव्हती; पण या दोघांच्या एकत्रित कृतीने यांना देशापेक्षा आयपीएल मोठी, असा संदेश दिला गेला. थोडक्यात, पंड्या हा अत्यंत गुणवान अष्टपैलू असला, तरी तो रोहित शर्मासारखा अनुभवी, लोकप्रिय, यशस्वी कर्णधार नाही. यामुळेही तो प्रेक्षकांचा लाडका होण्यास वेळ लागेल; पण या बदलाची कारणे काय असू शकतील?
याच्यामागे दोन प्रमुख कारणे असू शकतात. रोहित शर्माची गेल्या दोन आयपीएलमधील कामगिरी चांगली नाही. 2022 च्या आयपीएलमध्ये शर्माने 14 डावांत 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या, तर 2023 च्या मोसमात 16 डावांत 20.75 च्या सरासरीने 332 धावा केल्या. रोहित शर्माची आयपीएलची कामगिरी एक फलंदाज म्हणून नजीकच्या भूतकाळात तितकीशी चांगली नाही; पण त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याने गेल्यावर्षी विश्वचषकात आणि नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. तेव्हा कर्णधार म्हणून तो आजही उत्तम आहे,
तरी मुंबई इंडियन्सच्या मालकांना त्याचा उत्तराधिकारी शोधायची हीच योग्य वेळ असेच वाटत आहे. तेव्हा दोन मोसमांत गुजरातला एकदा विजेतेपद आणि एकदा उपविजेतेपद मिळवून देणार्या हार्दिक पंड्याला हेरण्यात त्यांची चूक नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, 2025 मध्ये आयपीएलचे मेगा ऑक्शन होणार आहे. गेल्यावेळच्या मेगा ऑक्शनच्या आधी बीसीसीआयने प्रत्येक फ्रँचायझीला तीन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूच कायम ठेवायची परवानगी दिली होती. हाच नियम जर पुढच्या वर्षीही लागू पडणार असेल, तर तीन भारतीय खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांची जागा सुरक्षित असेल. तिसर्या जागी रोहित शर्माचा विचार केला तर तेव्हा तो जवळपास 38 वर्षांचा असेल. आयपीएल आणि एकूणच क्रिकेटच्या द़ृष्टीने हे निवृत्तीचे वय आहे, तेव्हा संघाचा विचार करून पंड्याला कर्णधार करून ही तिसरी जागा पंड्यासाठी राखीव ठेवणे हा मुंबई इंडियन्सचा उद्देश आहे.
फ्रँचायझी क्रिकेट आणि त्यातून आयपीएल हे कायमच कुठच्या ना कुठच्या वादात अडकले जाते; पण आजची जगातली एक सर्वात यशस्वी, लोकप्रिय आणि प्रचंड श्रीमंत लीग असल्याने आयपीएल आपले मार्गक्रमण करतच राहील. इतर खेळातल्या लीगमध्ये हे कर्णधार बदलायचे प्रकार सर्रास घडतात; पण त्या नव्या कर्णधाराला रोष पत्करावा लागत नाही; कारण हा फ्रँचायझी खेळाचा एक भागच आहे. इथेही हार्दिक पंड्याने आपल्या कामगिरीत काहीच कसूर ठेवली नाही. जेव्हा घरच्या मैदानावरच्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईची वाताहत लागली, तेव्हा हार्दिक पंड्यानेच सुरेख फटकेबाजी करत 21 चेंडूंत 34 धावा काढल्या. त्याच्या सहा चौकारांसाठी प्रेक्षकांतून निळ्या महासागराचा जल्लोष झाला. जेव्हा मुंबई इंडियन्स संघ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरला तेव्हा पुन्हा प्रेक्षकांतून पंड्याच्या विरोधात घोषणा दुमदुमल्या. रोहित शर्माला अखेर प्रेक्षकांना शांत राहायचे आवाहन करावे लागले.
प्रेक्षकांचा खरं तर रोष हा पंड्यापेक्षा मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर आहे; पण तो जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी ते पंड्याला टार्गेट करत आहेत. या सर्व प्रक्रियेत पंड्याला नाहक प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागत आहे. त्याला प्रेक्षकांची मने जिंकायला एकच मार्ग आहे तो म्हणजे मुंबईला पुन्हा विजयीपथावर नेणे. जेव्हा मुंबई सामने जिंकायला लागेल, तेव्हा हा रोष आपोआप कमी होत जाईल; कारण यशासारखे दुसरे काही नाही. आज हार्दिक पंड्याला या प्रेक्षकांच्या रोषाने मैदानात उतरताना मेल्याहून मेल्यासारखे होत असेल; पण या मानसिक अवस्थेतून उत्तम कामगिरी करायची कणखरता त्याच्यात आहे. भारतातर्फे खेळणारा हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून खेळणारा हार्दिक पंड्या असा भेदभाव सध्या तो त्याच प्रेक्षकांकडून सहन करत आहे. जरी हा सांघिक खेळ असला, तरी जेव्हा मुंबई इंडियन्स आपली कामगिरी या मोसमात उंचावेल, तेव्हा हे सर्व बंद होईल; पण तूर्तास प्रेक्षकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. अर्थात, हल्ली कसोटी सामन्याच्या प्रेक्षकांनाही प्रत्येक चेंडूला सनसनाटीची अपेक्षा असताना आयपीएलच्या ग्लॅमरस क्रिकेटसाठी आलेल्या प्रेक्षकांकडून या प्रगल्भतेची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.