मुंबई : पुढारी वृत्तसेवा; घाटकोपरमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय गतिमंद मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी शौचालयामध्ये बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडिओ शूट करुन संशयित आरोपींनी तो इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घाटकोपर पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेत त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात केली आहे. (Mumbai Crime)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. १७ वर्षीय पीडित मुलगी ही घराजवळच्या सार्वजनिक शौचालयात नैसर्गिकविधीसाठी गेली होती. तिच्या मागावर असलेल्या यातील १४, १५ आणि १७ वर्षीय आरोपींनी तिला शौचालयाजवळ गाठले. या तिघांनीही तिला मारहाण करुन शौचालयात नेले. त्यानंतर १४ वर्षीय मुलाने तिच्यावर बलात्कार केला. तर, अन्य दोघांनी याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले.
पीडित मुलगी ही गतिमंद असून तिला बोलता येत नसल्याने तिच्यासोबत आरोपींनी केलेले कृत्य समोर आले नाही. पण, आरोपींनी पीडित मुलीवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ मुलीच्या भावाने बघितल्यानंतर शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मुलीच्या वडिलांची फिर्याद नोंदवून घेत आरोपींविरोधात भादंवि कलम ३७६, ३७६ (जे) (एल), ३२३, ५०० आणि ३४ यासह पोक्सो कायद्याच्या कलम ०४, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) ६७(बी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime)
हे ही वाचा :