Latest

MI vs DC : मुंबईचा दिल्लीवर थरारक विजय; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा ६ गडी राखून विजय मिळवला. हा मुंबईचा हंगामातील पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने मुंबईला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने ते शेवटच्या बॉलवर दोन धावा घेत ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. (MI vs DC)

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी आक्रमक सुरूवात केली. त्यांनी ६ ओव्हरमध्ये ६८ धावा केल्या. मात्र, आक्रमक इशान किशन २६ बॉलमध्ये ३१ धावा करून धावबाद झाला. (MI vs DC)

इशान किशन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी डावखुऱ्या तिलक वर्माला बढती देऊन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजाचीसाठी पाठवले. या दोघांनी १२ व्या ओव्हरमध्ये संघाला १०० धावांचा टप्पा पार करून दिला.

या जोडीने नाबाद अर्धशतकी मजल मारत सामना ३० बॉलमध्ये 50 धावा असा आणला होता. अखेरच्या ५ ओव्हरमध्ये तिलक वर्माने आपला आक्रमक खेळी करत कुमारच्या गोलंदजीवर पहिल्या तीन चेंडूवर चौकार, षटकार आणि षटकार खेचला. मात्र याच षटकात पाचव्या चेंडूवर तिलक वर्मा २९ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. पाठोपाठ सूर्यकुमार पहिल्याच बॉलवर बाद होवून तंबूत परतला. त्याला मुकेश कुमारने बाद केले.

सूर्याकुमार बाद झाल्यानंतर मुंबईला विजय मिळवून देण्याची सर्व जबाबदारी रोहित शर्मावर होती. मात्र तोही ४५ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला. यानंतर ग्रीन आणि टीम डेव्हिड यांनी सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. अखेर मुंबईला विजयासाठी ७ चेंडूत ११ धावांची गरज होती. टीम डेव्हिडने मुस्तफिजूरला षटकार खेचत सामना ६ बॉलमध्ये ५ धावा असा आणला.

नॉर्त्जेने सामना ३ बॉलमध्ये ४ धावा असा आणला. टीम डेव्हिडने एक धाव घेतल्याने मुंबईला विजयासाठी २ बॉलमध्ये ३ धावांची गरज होती. ग्रीनने एक धाव काढली अन् सामना १ बॉल २ धावा असा आला. टीम डेव्हिडने कशा बशा दोन धावा करत मुंबईला सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, कर्णधार डेव्हिड वॉर्नर (५१) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध १९.४ ओव्हरमध्ये सर्वबाद १७२ धावा केल्या. हे दोघे वगळता दिल्लीच्या इतर फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीपुढे नांगी टाकली.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्‍या मुंबईने दिल्लीला सुरुवातीपासूनच धक्के दिले. मात्र, दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिल्लीची धावगती चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीने पहिल्या पॉवरप्लेच्या ६ ओव्हरमध्ये अर्धशतकी मजल मारली. मात्र, त्यानंतर पीयूष चावला, ऋतिक शौकीन आणि मेरिडेथ यांच्या भेदक मार्‍यासमोर दिल्लीची अवस्था ५ बाद ९८ धावा अशी झाली. एका बाजूने दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नर एका बाजूने किल्ला लढवत होता. अखेर त्याला अष्टपैलू अक्षर पटेलची साथ लाभली.

अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला १५० च्या पार पोहोचवले. दरम्यान, अक्षरने २२ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, शेवटची दोन षटके राहिली असताना बेहेरनडॉर्फने ५४ धावांवर अक्षर पटेलला बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरदेखील ४७ चेंडूंत ५१ धावा करून बाद झाला. उरलेल्या शेपटाने फारशी वळवळ केली नाही. दिल्लीचा डाव १७२ धावांवर आटोपला. पीयूष चावला, बेहेरनडॉर्फने प्रत्येकी ३, तर रिले मेरिडेथने २ विकेटस् घेतल्या.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT