Latest

शिरूर : ‘मुल्हेर’वर पुन्हा बसविल्या तोफा, गहाळ झालेल्या तोफांचा सह्याद्री प्रतिष्ठानने घेतला शोध

अमृता चौगुले

शिरूर, पुढारी वृत्तसेवा: शिरूर सह्याद्री प्रतिष्ठानच्या तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या रामप्रसाद व शिवप्रसाद या दोन तोफांसाठी नव्याने गाडे बनविले आहेत. शिरूर शहर पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी श्रमदानातून दुर्गसंवर्धनाचे काम केले जाते. 'सह्याद्री प्रतिष्ठान'च्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात शिरूरमधील कुणाल काळे, उमेश शेळके, लोकेश शर्मा, उदय शेळके, शुभम माळवदे, भूषण खैरे, योगेश फाळके, विकास सांबारे, पराग खराडे, विकास थोरात, सुनील इंदुलकर, रामराज गवारे, तुषार श्रीमंत, ऋषिकेश कंदलकर, गणेश पाचर्णे, राकेश परदेशी, सिद्धार्थ चाबुकस्वार आदी कार्यकर्ते श्रमदानातून योगदान देतात. दरम्यान, प्रतिष्ठानने मुल्हेर किल्ल्यावरील रामप्रसाद व शिवप्रसाद या शिवकालीन तोफांचा शोध सुरू केला.

त्यात शिरूरच्या मावळ्यांनी योगदान दिले. या तोफा गहाळ झाल्याचे सांगितले जात होते. सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी गडाच्या पायथ्यालगत असलेल्या जंगलात, दन्याखोर्‍यांत या तोफांचा शोध घेतला. तेव्हा दाट झाडीने वेढलेल्या दरीत या तोफा आढळल्या. दुर्गसेवकांनी तब्बल बारा तास अथक मेहनत घेऊन या तोफा गडावर नेल्या.

मुल्हेर किल्ल्याच्या इतिहासात नोंद असलेल्या चारपैकी या दोन तोफा अनेक वर्षांपासून गायब होत्या. यातील शिवप्रसाद ही दोन हजार दोनशे किलो वजनाची, तर रामप्रसाद ही एक हजार दोनशे किलो वजनाची होती. अडगळीतील या तोफा तरुणांमुळे नुकत्याच किल्ल्यावर विराजमान झाल्या. तोफा ठेवण्यासाठी तोफगाडे नसल्याने शिरूरच्या दुर्गसेवकांनी लोकवर्गणीतून सुमारे दीड लाख रुपये जमविले. त्यातून जुन्या सागवानी लाकडापासून तोफगाडे बनवून घेतले. या गाड्यांवर या तोफा बसविण्यात आल्या आहेत. हे तोफगाडे समारंभपूर्वक दुर्गार्पण केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT