Latest

फलटणमध्ये खासदार गटातच जुंपली ! रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी फसवणूक केल्याचा आरोप

अमृता चौगुले

फलटण : पुढारी वृत्तसेवा : माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सुमारे कोट रुपयांची फसवणूक केला असल्याचा आरोप दिगंबर आगवणे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. याप्रकरणी फलटण पोलिस ठाण्यात अर्ज दिला असून तात्काळ न्याय न मिळाल्यास दि. 7 रोजी फलटण तहसील कार्यालयासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आगवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाईक-निंबाळकर यांना त्यांनी व्यवसायाच्या संबंधांतून रक्कम पाठवली होती. स्वराज डेअरीसाठी 2007 ते 2017 पर्यंत लाकूड पुरवण्याचे काम आगवणे यांनी केले. आगवणे यांच्या दोन ठिकाणच्या जमिनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज नाईक-निंबाळकर यांनी सांगितल्याने ते काढले. त्याबदल्यात स्वराज डेअरीचे व्हाईस चेअरमन पद देण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन पाळले गेले नाही. 2015 साली एका बँकेतून नाईक-निंबाळकर यांच्या सांगण्यावरुन 2 कोटी 15 लाखाचे कर्ज काढून त्यांना दिले. मात्र त्याची त्यांनी परतफेड केली नाही. आता आगवणे यांना एका पतसंस्थेची नोटीस आल्याने खासदारांनी व्याजासह पैसे परत द्यावेत, अन्यथा आत्महत्या करणार असल्याचा इशारा आगवणे यांनी दिला आहे.

दिगंबर आगवणे यांनी केले आरोप हे दिशाभूल करणारे आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बँकाना तारण ठेवली आहे. दिगंबर आगवणे यांना पुर्वीच्या काळामध्ये चांगल्या भावनेनेच मदत केली होती. दिगंबर आगवणे म्हणजे मिस्टर
नटवरलाल आहेत, असा टोला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

आगवणे म्हणजे मिस्टर नटवरलाल : खा. निंबाळकर

खा. निंबाळकर म्हणाले, यापुर्वीच्या आमदारकीला जी मते मिळाली ती फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच आगवणे यांना मिळाली आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बँकाना तारण ठेवली आहे. त्यामुळे विविध बँका अडचणीत आल्या आहेत. आगवणे यांनी विविध बँकाना यापुर्वीच फसवले आहे. त्यांना पुर्वी जी मदत केली होती ती चांगल्या भावनेनेच केली आहे. आगवणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना जे पैसे दिलेे आहेत ते चेकने किंवा बँकेद्वारेच दिले आहेत.

तसेच त्यांना स्वराज पतसंस्थेमधून कर्ज दिलेे होते. त्यावेळी आगवणे यांना पुन्हा पैश्याची गरज भासल्याने त्यांनी पुन्हा नव्याने कर्ज काढले व त्यावेळी जुने कर्ज भरले. आगवणे यांच्या कर्जाचा कधीही हप्ता आम्ही भरलेला नव्हता व नाही. आगवणे विधानसभेला उभे होते तेव्हा त्यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रात कर्जाचा उल्लेख केला आहे. व त्या कर्जासाठी त्यांनी तारण सुध्दा ठेवलेे होते तर ते कर्ज बोगस कसे होईल. आगवणेंकडूनच मला साधारण आठ कोटी येणे आहेत. त्यामुळे त्यांचे सुमारे दोन कोटी होल्ड केलेे आहेत. आठ कोटी मधून दोन कोटी वजा करता सुमारे सहा कोटी त्यांच्याकडून येणे आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांना दिल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT