Latest

आंदोलन रामजन्मभूमी मुक्तीचे

Arun Patil

रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन तर सर्व अर्थांनी साधू-संतांच्या आधारानेच उभे राहिले होते. विशेष म्हणजे रामजन्मभूमीसाठी संघर्ष करताना सर्व पंथोपपंथांचे साधू, संन्यासी, बैरागी नेहेमीच संघटित राहिले होते. अयोध्या व रामजन्मभूमीचा इतिहास साधू, संन्यासी आमि बैराग्यांच्या उल्लेखांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

पुरातन भारतातील सर्वात मोठ्या व शक्तिशाली साम्राज्याची, रघुवंशाची राजधानी असलेले शहर म्हणजे अयोध्या! त्या लौकिकाला साजेल असेच ते शहर असल्याचे वर्णन वाल्मीकी रामायणापासून अनेक प्राचीन ग्रंथांमधून आपल्याला वाचायला मिळते. अयोध्येच्या दोन-अडीच हजार वर्षांच्या ज्ञात इतिहासात अयोध्येची अनेक वैशिष्ट्ये नोंदवली गेली आहेत. ही अयोध्या नगरी जशी राजधानी होती, तशीच विद्येचे केंद्र होती. अनेक संस्थांच्या माध्यमातून विविध विषयांचे अध्ययन, अध्यापन तेथे चालत असे. तेथील पाठशाळांमध्ये देश-विदेशातून विद्यार्थी येत असत. त्याचमुळे स्वाभाविकरीत्या ते साहित्य संस्कृती कलेचेही केंद्र होते, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते, त्याचप्रमाणे लष्करी हालचालींचे केंद्रसुद्धा होते.

या सगळ्याखेरीज आणखी एक वैशिष्ट्य अयोध्येच्या नावावर नोंदवले जाते. ते म्हणजे अयोध्या हे भारतातले असे एक शहर आहे की, जे तेथील साधू-संन्याशांच्या वास्तव्यासाठी आणि संख्येसाठी गेली अनेक शतके प्रसिद्ध आहे. किमान दोन हजार वर्षांच्या इतिहासात अयोध्या आणि परिसरातील साधू आणि संन्याशाच्या मठांचे अनेक उल्लेख सर्व प्रकारच्या साहित्यात आढळतात. भारतात जेवढे पंथ आहेत, त्या बहुतेक सर्व पंथ-उपपंथांचे मठ – 'आखाडे' तिथे आहेत आणि त्यांची परंपरा कित्येक शतकांची आहे. अयोध्येच्या लोकसंख्येत जवळपास निम्मा वाटा या साधू, संन्याशांचा असतो. आपण साधू, संन्यासी, बैरागी हे शब्द जवळपास समान अर्थाने वापरतो; पण प्रत्यक्षात ते बरोबर नाही. साधू, संन्यासी व बैरागी हा प्रत्येक वर्ग वेगळा आहे. त्याला वेगवेगळ्या पंथांच्या मान्यतेच्या विविध छटा आहेत. या सर्व छटांचे मठ अयोध्येत आहेत.

रामजन्मभूमी मुक्तीच्या संघर्षात या साधू-संतांनी सर्व प्रकाराने लढे दिलेले आहेत. औरंगजेबाच्या हुकुमाने फिदाई खान राम मंदिर पाडण्यासाठी 1660 मध्ये जेव्हा अयोध्येवर चाल करून आला, तेव्हा त्याचा यशस्वी प्रतिकार समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मठामधील चिमटाधारी साधू आणि निहंग शिखांनी मिळून केला होता. आपल्या पहिल्या प्रयत्नात फिदाई खानला दारुण पराभव चाखावा लागला होता. दुसर्‍या वेळेला वाढीव कुमक घेऊन आल्यानंतरच साधूंचा तो प्रतिकार मोडून काढण्यात फिदाई खानला यश मिळाले होते. या साधू-संतांनी केवळ सशस्त्र संघर्ष व आंदोलने केली नाहीत, तर रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी न्यायालयीन लढेही दिले. अशा न्यायालयीन लढ्यांची सुरुवात त्यांनी केली व ते अखेरपर्यंत चालवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT