Latest

Mother’s Day 2022 : आई होती म्हणूनी…

Arun Patil

आज माझी जी काही ओळख बनवू शकले, त्याच्या मागे माझ्या आईची शक्ती फार मोठी आहे. माझ्या आईने तिच्या आयुष्याची जी स्वप्ने पाहिली होती, ती तिला पूर्ण करता आली नाहीत; परंतु तिने माझ्यासाठी असा मार्ग तयार करून दिला, ज्यायोगे मी माझी स्वप्ने साकार करू शकले. आज जागतिक मातृदिन (Mother's Day 2022). त्यानिमित्ताने…

माझी आई स्नेहलता दीक्षित ही लग्नापूर्वी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावात राहात असे. त्यांचे एकत्रित कुटुंब होते. त्या काळातील लोक खूपच रूढीवादी असत. माझ्या आईला शास्त्रोक्त नृत्य शिकावेसे वाटत होते. परंतु जेव्हा ही गोष्ट घरात समजली, तेव्हा जणू काही डोंगरच कोसळला. चांगल्या कुटुंबातील मुली नृत्यकला शिकत नाहीत, असेच सर्वांनी तिला सांगितले. आपली इच्छा आता अधुरी राहणार, असे आईला वाटू लागले. काही दिवसांनंतर तिने तिच्या आईला तयार केले आणि त्यानंतर कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही तयार केले, तेव्हा कुठे तिला शास्त्रीय नृत्याऐवजी शास्त्रीय संगीत शिकण्याची परवानगी मिळाली. तानपुरा हातात घेऊन आई शास्त्रीय संगीत शिकली.

माझे वडील शंकर दीक्षित यांच्याशी लग्न झाल्यानंतर आई त्यांच्याबरोबर मुंबईला आली. तिच्यावर प्रचंड कौटुंबिक जबाबदार्‍या होत्या. तीन मुली आणि एक मुलगा अशी आम्ही चार भावंडे. शिवाय वडील आणि आजी, अशा मोठ्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे दिवसभर आई कामात असायची. स्वयंपाकापासून आमच्याकडून होमवर्क करून घेण्यापर्यंत सर्व कामे आईला करावी लागत असत. आईला संगीतात रुची आहे, हे माझ्या वडिलांना ठाऊक होते.

दिवसभर कामात व्यग्र असतानासुद्धा आई संगीतासाठी वेळ काढत असे. आईने मनात आणले असते, तर गायिका बनण्याचे स्वप्न ती साकार करू शकली असती. कमीत कमी संगीत शिक्षक म्हणून तरी आपल्या आवडत्या क्षेत्रात ती काम करू शकली असती. परंतु आईने ते सर्व बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे मानले. संगीतासाठी अधिक वेळ दिल्यास कुटुंबासाठी वेळ कमी राहील, असा विचार तिने केला. करिअर आणि कुटुंब यात आईने नेहमीच कुटुंबाला अधिक महत्त्व दिले.

हार्मोनियम किंवा तानपुरा घेऊन आई जेव्हा संगीताचा रियाज करीत असे, तेव्हा दूर बसलेले वडील आईला दाद देत असत. अर्थात, त्यांना ऐकायला कमी येत असे. लग्नानंतर आठ वर्षांतच वडिलांना या समस्येने घेरले होते. जेव्हा वडील आईची तारीफ करीत असत, तेव्हा मी वडिलांना विचारत असे, "तुम्हाला कसे काय ऐकू येते आईचे गाणे?" यावर वडील उत्तर देत असत, "मला आईचे गाणे ऐकू येत नाही; परंतु त्या गाण्याची कंपने मला जरूर जाणवतात, म्हणून मी आईला दाद देतो. माझे प्रोत्साहन मिळून तिने तिची कला अशीच जोपासावी, वाढवावी. ती नेहमी अशीच गात राहावी असे मला वाटते." (Mother's Day 2022)

आमच्या घरातील वातावरण अगदी खुले, मोकळे होते. मला नृत्य, संगीत, चित्रकला या सर्व कला आईकडून वारसा म्हणूनच लाभल्या आहेत. आईच्या पाठिंब्यामुळे लग्नापूर्वी मी माझे करिअर खूपच एन्जॉय केले आहे. जेव्हा मी लग्न करावे, असे माझ्या कुटुंबीयांना वाटले तेव्हा मी ते केले आणि माझे वैवाहिक आयुष्यही प्रेमाने, मनापासून सजवले. माझ्या जीवनातील प्रत्येक निर्णय योगायोगाने घेतलेला होता आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीची कधी रुखरुख लागून राहिली नाही.

माझ्या आईने आमच्या कुटुंबासाठी तिच्या आवडी आणि करिअर 'बॅक सीट'वर ठेवले होते. परंतु तसा निर्णय घेतल्याचे तिला कधी वाईट वाटले नाही. आईचा कुटुंबाविषयीचा समर्पण भाव आणि तिचा त्याग आम्हा सर्वांसाठी अनुकरणीय आहे. ईश्वर जीवन सगळ्यांनाच देतो; परंतु ते जीवन कसे जगायचे, याची कला सर्वांना अवगत नसते. जीवन सुख, समाधान आणि संतुष्टपणे कसे जगायचे, हे मी माझ्या आईकडूनच शिकले.

माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की, ज्यावेळी त्यांचे लग्न झाले तेव्हा आईने वडिलांना असे बजावले होते की, जेव्हा मला मुलगी होईल तेव्हा मी तिला शास्त्रीय नृत्य शिकवेन. आम्ही तीन बहिणी. भारती, रूपा आणि मी. भारती आणि रूपाला कथ्थक शिकवायला गुरुजी घरी येऊ लागले. त्यांचे शिक्षण सुरू झाले. मी पडद्याच्या मागे उभी राहून भारती आणि रूपाचे कथ्थक पाहत असे. त्यावेळी माझे वय तीन-चार वर्षांचे असेल. त्यांना नृत्य करताना पाहून माझेही पाय थरारू लागत. (Mother's Day 2022)

गुरुजींनी एकदा आईला सांगितले, "तुम्ही बबलीचा (माधुरी) नृत्याभ्यास आतापासूनच सुरू करा. ती जन्मजात नृत्यांगना वाटते." गुरुजींनी असे सांगायचाच अवकाश होता! आईने लगेच मला कथ्थक शिकवायला सुरुवात केली. आज मी एक चांगली नृत्यांगना म्हणून ओळखली जाते, त्याचे श्रेय आईची मेहनत आणि तिने माझ्यासाठी पाहिलेल्या स्वप्नालाच जाते.

'अबोध' चित्रपटामुळे मी अभिनेत्री झाले खरी; परंतु खरे वलय मिळाले ते 'तेजाब'मुळे! परंतु एका स्टारला मिळते तशी वागणूक मला घरी कधीही मिळाली नाही. मला आईने सांगितले होते, "तुला ऑस्कर मिळाले तरी घरात तू आमची मुलगीच आहेस. घराने दिलेले संस्कार कधी विसरू नकोस. मोठ्यांचा आदर केलास तर खूप पुढे जाशील. माणूस कधीच कोणत्या एका गुणामुळे पुढे जात नसतो. त्या गुणाच्या आसपास चांगल्या संस्कारांची प्रभावळही असावी लागते आणि तीच त्याला मोठा करते."

माझ्या आईचा प्रभाव या ना त्या रूपात माझ्यावर नेहमी राहिला आहे. माझ्या आईने आम्हा भावंडांचा सांभाळ जसा केला, तसाच मी माझ्या मुलांचा करते. रायन आणि आरिन ही माझी दोन मुले जेव्हा लहान होती तेव्हा मी माझे करिअर नेहमी 'बॅक सीट'वर ठेवले होते. वाढत्या मुलांना माझी गरज होती. मला जर पुन्हा अभिनयाच्या दुनियेत यायचे असेल, तर मला संधी मिळेल की नाही, अशी जराही शंका माझ्या मनात कधी आली नाही. (Mother's Day 2022)

माझ्या आईची संगीतकला आता माझ्या मुलांना वारसा म्हणून लाभली आहे. रायन आणि आरिन संगीतात अव्वल आहेत. आज लोक मला पूर्ण अभिनेत्री आणि परिपूर्ण आईचा दर्जा देतात; मात्र त्याचे श्रेय माझ्या आईने मला दिलेल्या संस्कारांना जाते. आपली आई अभिनेत्री आहे, याचा अर्थ अभिनय ही आपली संपत्ती आहे असे आपण समजता कामा नये, याची जाणीव माझ्या मुलांना झाली आहे.

त्यांच्याकडे जर अभिनयाची कला असेल, तर ती त्यांनी जोपासली आणि वाढविली पाहिजे. माझी आई मला नेहमी सांगत असे की, वाळू कधीच मुठीत घट्ट पकडू नकोस. कारण मुठीत वाळू जितकी घट्ट पकडावी, तितकी ती लवकर मुठीतून घसरते. मुलांवर जबरदस्तीने कोणतेही संस्कार करायचे नसतात. तसे केल्यास मुलांना त्याचा उबग येतो. प्रेमाने आणि धैर्याने मुलांचे संगोपन करायला हवे, हे आईचे बोल आहेत आणि मी त्याच प्रकारे मुलांचे संगोपन करते आहे.

माधुरी दीक्षित-नेने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT