file pic 
Latest

पुणे : क्षुल्लक कारणावरून सासूने केला सुनेचा खून; काय आहे नेमकं प्रकरण ?

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुलाला सांभाळत नसल्याच्या कारणावरून सुनेने शिवीगाळ केली. या रागातून सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना लोहगाव भागात घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सासूला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, सुनेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव सासूने केला होता. मात्र, पोलिस चौकशीत खुनाचा प्रकार उघड झाला आहे. रितू रवींद्र माळवी (वय 28, कलवडवस्ती, लोहगाव) असे मृत सुनेचे नाव आहे.

याप्रकरणी सासू कमला प्रभुलाल माळवी (वय 49) हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक समू चौधरी यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रितू माळवीला घरकाम जमत नाही तसेच नातवालाही व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करून सासू कमला तिचा छळ करीत होती. दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरातील फ्रिज उघडताना रितूला सासूचा पाय लागल्याने वाद झाला होता. त्या वेळी रितूने सासू कमलाशी वाद घातला. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले.

या घटनेत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात रितूच्या डोक्याला दुखापत तसेच तिला मारहाण झाल्याचे उघड झाले. सासू कमलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे निरीक्षक संगीता माळी, सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. लहाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रेमविवाहामुळे सासू करीत होती सतत विरोध
रवींद्र आणि रितू यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या लग्नाला सासू कमलाचा विरोध होता. मुलगा झाल्यानंतरही कमलाचा विरोध कायम होता. त्यामुळे विविध कारणांवरून नेहमी सुनेशी भांडण करीत असे. 6 मार्च रोजी पहाटे चहा करण्यासाठी सासू बेडरूममधील फ्रिज उघडत असताना त्यांचा पाय सुनेला लागला. त्यावरून सुनेने त्यांना शिवीगाळ केली. त्यातूनच खुनाचा प्रकार घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT