नवी दिल्ली : आपण जेव्हा जगातील महागड्या वस्तूंबद्दल बोलतो, त्यावेळी त्यात घर, गाडी किंवा दागिन्यांचा समावेश आवर्जून होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या जगात झाडेही मोठ्या किमतीची आहेत. आपण लहानपणापासून चंदनाचं झाड हे सर्वात महाग असल्याचं ऐकत आलो आहे; पण जगात त्याहूनही अधिक महागडी झाडं आहेत.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार बोलायचं झालं तर, जगातील सर्वात महाग झाड 'स्टाकसपर्र गोल्डन डिलिशियस अॅपल ट्री' हे आहे. हे एक सफरचंदाचं झाड आहे. जगातील सर्वात महाग झाडाचा विक्रम याच झाडाच्या नावावर आहे. 1959 मध्ये जेव्हा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या झाडाचं नाव नोंदवलं गेलं होतं, तेव्हा या झाडाची किंमत 51 हजार डॉलर होती. भारतीय रुपयांत बोलायचं झाल्यास याची किंमत 42 लाख रुपये होती. आज याच झाडाची किंमत पाहायला गेलो तर ती याहूनही जास्त असेल.
एजेड अॅनिमल्स नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, जपानच्या काटो फॅमिलीत 1000 वर्ष जुनं बोन्साय झाड आहे. या झाडाची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. मात्र, या झाडाचं नाव अद्याप गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं नाही. सर्वात महाग झाडांमध्ये काही लोक 'मारिया डी लॉस एंजेलिस'चं नाव घेतात. हे झाड देखील सुमारे 700 वर्षं जुनं आहे. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे झाड जिवंत ठेवण्यात आल्याचं लोकांचं म्हणणं आहे. तर 'आफ्रि कन ब्लॅकवूड ट्री' हे देखील जगातील सर्वात महागडं झाड असल्याचं म्हटलं जातं. त्याच्या एक किलो लाकडाची किंमत 10,000 डॉलर इतकी आहे.