पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कपमधील सर्वात हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना आज (शनिवारी) श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारत आपल्या शेजारच्या देशाबरोबर मागील काही वर्ष द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांसमाेर येतात. आज आशिया चषक स्पर्धेनिमित्त दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येत आहेत. या सामन्यातील उत्कंठा शिगेला पोहोचली असून, खेळाडूंवरही दडपण आहे. ( India Vs Pakistan Cricket match ) आजवर भारत-पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज क्रिकेट सामन्यात अनेकदा खेळाडू एकमेकांशी भिडले आहेत. जाणून घेवूया दोन्हीसंघातील पाच मोठे वादाचे प्रसंग…
३ नोव्हेंबर १९७८ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वन-डे सामना जफर अली स्टेडियमवर खेळला गेला. त्या काळात गोलंदाजाांना बाऊन्सर्सचा ( उसळी चेंडूचा) नियम इतका कडक नव्हता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३७ षटकांत २ गडी गमावून १८३ धावा केल्या. यानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने ३८व्या षटकात सर्फराज नवाजकडे चेंडू सोपवला. त्या षटकात नवाजने सलग चार बाऊन्सर अंशुमन गायकवाडला टाकले. मात्र, पंचांनी एकही चेंडू वाईड घोषित केला नाही. यामुळे संतापलेल्या भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदीने आपल्या फलंदाजांना ड्रेसिंग रूममध्ये बोलावून सामना पाकिस्तानकडे सोपवला. एखाद्या कर्णधाराने रागाच्या भरात प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळवून देण्याची वनडेत ही पहिलीच वेळ होती.
ऑस्ट्रेलियात १९९२मध्ये झालेल्या वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये साखळी सामना झाला. प्रथम फलंदाजची करताना भारताने पाकिस्तानला २१७ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने झटपट दोन विकेट गमावल्या होत्या. सचिन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. यावेळी टीम इंडियाचे यष्टीरक्षक किरण मोरे सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विकेटच्या मागे वारंवार टिपण्णी करत होता. पाकिस्तानचा फलंदाज जावेद मियाँदाद नाराज झाला. किरण मोरे आणि जावेद मियाँदाद यांच्या बाचाबाची झाली. मियाँदादनेही पंचांकडे जाऊन किरणची तक्रार केली. पुढच्या चेंडूवर मियांदाद दोन धावांवर धावत असताना किरण मोरेने त्याच्याविरुद्ध धावबाद झाल्याचे अपील केले. बिथरलेल्या जावेदने बेडकाप्रमाणे क्रेझवर उड्या मारायला सुरुवात केली. या घटनेचा प्रेक्षकांनी खूप आनंद घेतला. अखेर भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला.
९९६ वन-डे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे उपांत्यपूर्व फेरीत आमने-सामने आले. या स्पर्धेतील हा सामना फायनल सारखाच झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर २८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसर्या डावाच्या सुरुवातीला पाकिस्तानचा सलामीवीर अमीर सोहेलने व्यंकटेशला चौकार ठोकला आणि त्याच्याकडे बोट दाखवले. अप्रत्यक्षपणे त्याने व्यंकटेशला आव्हानच दिले. मात्र पुढच्या चेंडूवर व्यंकटेशने सोहेलला क्लीन बोल्ड केले. यानंतर सोहेलला त्याच्याच शैलीत बोट दाखवत पॅव्हेलियनमध्ये परतण्याचे संकेत व्यंकटेशने दिले. आजही हा प्रसंग भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायम आहे.
२००७ मध्ये कानपूरमधील मैदानात वन-डे सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले. या सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी मैदानाच्या मध्यभागी एकमेकांशी भिडले. आजही क्रिकेट चाहत्यांना हा प्रसंग आठवतो. आफ्रिदीच्या एका चेंडूवर गंभीरने चौकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर सिंगल घेण्यासाठी धावला.गंभीर धावा काढण्यासाठी धावत असताना आफ्रिदी त्याला अडवा आला. दोघांमध्ये टक्कर झाली. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मैदानी पंचांनी मध्यस्ती केली. सामन्यानंतर पंच रोशन महानामा यांनी आफ्रिदीला सामन्याच्या ९५ टक्के आणि गंभीरला ६५ टक्के दंड ठोठावला.
२०१० च्या आशिया चषक स्पर्धेतील सामना श्रीलंकेतील डंबुला येथे झाला. फिरकीपटू सईद अजमलचा चेंडू गंभीरच्या बॅटमधून चुकला आणि यष्टीरक्षक कामरान अकमलच्या हातात गेला. कामरान आनंदाने अपील करण्यासाठी खेळपट्टीवर पोहोचला. पंचांनी कामरानचे अपील फेटाळले. त्यामुळे गंभीर क्रीजवर राहिला. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान गंभीर आणि कामरान यांच्यात भांडण सुरू झाले. दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर मैदानी पंच बिली बॉडेन यांनी कामरानला गप्प केले. तर नॉन स्ट्रायकरला असलेल्या महेंद्रसिंग धोनी याने गौतम गंभीरची समजूत काढून त्याला शांत केले.
हेही वाचा :