पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानचे पोलीस महासंचालक (डीजीपी) उमेश मिश्रा यांनी सोमवारी (दि. १४) सांगितले की, राज्यातील घाटमिका गावातील नासिर-जुनेद हत्याकांडात मोनू मानेसरचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले नाही. मात्र, राजस्थान पोलिसांनी या प्रकरणात त्याला क्लीन चिट दिलेली नाही. तसेच हत्येतील कटाच्या मुख्य सुत्रधाराचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.
सोमवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना डीजीपी मिश्रा म्हणाले, "या घटनेत ज्यांचा थेट सहभाग होता ते घटनास्थळी उपस्थित होते, मोनू त्यामध्ये नव्हता अशी माहिती संमोर आली आहे. तसेच मोनूची पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरु आहे" त्या हत्येतील आरोपींना पकडण्यासाठी हरियाणा पोलिसांच्या संपर्कात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुख्य मुद्दा हा गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असल्याने हरियाणा पोलीस सहकार्य करत आहेत की नाही हे सांगता येणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगतिले.
हरियाणातील भिवानी जिल्ह्यात १६ फेब्रुवारी रोजी जुनैद (३५) आणि भरतपूर येथील नसीर (२७) यांचे जळालेले मृतदेह एका वाहनात सापडले होते. दोघांचेही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केले, मारहाण करून त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, संघटनेने हा आरोप फेटाळून लावला. एफएसएल अहवालाने पुष्टी केली आहे की जळालेले मृतदेह जुनैद आणि नसीर यांचे आहेत आणि ज्या वाहनातून त्यांचे अपहरण करण्यात आले होते त्या वाहनावरील रक्ताचे डाग जुळत आहेत. एफआयआरमध्ये मोनू मानेसरसह एकूण 21 आरोपींची नावे आहेत.