Latest

पुणे : पुण्यातील सावकाराची अजब सावकारी, विधवा मुलीशी लग्न करण्यासाठी दबाव

अमृता चौगुले

पुणे: पुण्यातील सावकारीचा अजब प्रकार समोर आला आहे. व्यवसायासाठी व्याजाने घेतलेले पैसे देण्यासाठी मुदत मागितल्यानंतर समाजातील विधवा मुलीशी विवाह करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी सावकाराने तरूणाला विधवा मुलीशी लग्न कर अन्यथा फ्लॅटची गहाण कागदपत्रे देणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर गुन्हे शाखेकडे धाव घेत याबाबत मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल जयभगवान बन्सल (53, रा. हरीगंगा सोसायटी, मार्केटयार्ड) याला याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. तर मुकेश बन्सल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात मिलिंद मोहन वडणगेकर (54, रा. सदाफुली अपार्टमेंट, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद वडणगेकर यांनी आपला मुलगा शुभम याच्या व्यावसायासाठी संशयीत आरोपी अनिल बन्सल याच्याकडून 10 लाखांचे जानेवारी 2017 मध्ये व्याजाने कर्ज घेतले होेते. त्या बदल्यात बन्सलकडे कोथरूड येथील सदनिकेची कागदपत्रे गहाण ठेवली होती. तसेच या रकमेच्या बदल्यात एक कोरा धनादेशही बन्सलला दिला होता. आतापर्यंत फिर्यादी यांनी बन्सल याला 12 लाख 93 हजार रूपये दिले होते. तरी देखील तो कागदपत्रे परत करत नव्हता.

तो आणखीन व्याजाची मागणी करत होता. याच कारणास्तव तो फिर्यादीच्या देखील घरी गेला होता. त्याने पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादी यांनी त्यासाठी थोडासा वेळ मागितला. त्यावर बन्सलने फिर्यादीला त्याच्या समाजातील विधवा मुलीशी फिर्यादीच्या मुलाचे लग्न करण्यास दबाव टाकला. त्यांच्या समाजातील मुलीशी मुलाचे लग्न कर अन्यथा तुझ्या फ्लॅटची कागदपत्रे देणार नाही अशी धमकी त्याने फिर्यादीला दिली. बन्सल याची विचित्र अट मान्य नसल्याने व पैसे देऊनही तो तगादा लावत असल्याने सरते शेवटी वडणगेकर यांनी गुन्हे शाखेला याबाबत तक्रारअर्ज दिला. त्यानंतर हे प्रकरण दाखल करण्यासाठी मार्केटयार्ड पोलिसांकडे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सावकाराला बेड्या ठोकल्या आहेत. पुढीत तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबर करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT