पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ( Mohammed Siraj ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) भ्रष्टाचारविरोधी युनिटकडे तक्रार केली आहे. सिराजने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, "एका व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. त्याला वेगवान गोलंदाजांकडून 'आतली माहिती' जाणून घ्यायची होती. ही व्यक्ती क्रिकेटवर सट्टा खेळत होती. त्याने सट्टेबाजीत मोठी रक्कम गमावली असल्याचेही मला सांगितले. आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेदरम्यान संबंधिताने सिराजशी संपर्क साधला होता, असेही त्याने तक्रारीत नमूद केले आहे.
यासंदर्भात 'बीसीसीआय'च्या वरिष्ठ सूत्रांनी 'पीटीआय'ला सांगितले की, "सिराजशी संपर्क करणारा बुकी नव्हता. हा हैदराबादमधील एक चालक होता. त्याला क्रिकेटवर सट्टा खेळण्याचे व्यसन लागले आहे. त्याने मोठी रक्कम गमावली होती. त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडून आतल्या बातम्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सिराज याने तत्काळ याची माहिती आम्हाला दिली आहे. सिराजबरोबर संपर्क साधणार्या सट्टेबाजाला पकडले आहे. याबाबतची पुढील माहिती मिळण्यासाठी आम्ही प्रतीक्षेत आहोत."
किक्रेटपटू एस श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला स्पॉट-फिक्सिंग घोटाळ्या अडकल्याचे उघड झाले होते. तसेच CSK संघाचा गुरुनाथ मयप्पन यांच्या सट्टेबाजीचे संबंध समोर आले होते. यानंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये आली. क्रिकेटमधील फिक्सिंग रोखण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली. भ्रष्टाचारविरोधी युनिट स्थापन करण्यात आले. कोणीही खेळाडूंना बेकायदेशीर भेटण्याचा प्रयत्न केला तर तत्काळ क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटशी संपर्तक साधावा असे आवाहन करण्यात आले होते. तसेच खेळाडूंनी यासंदर्भातील माहिती दिली नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही बीसीसीआयने दिला होता.