Latest

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

मराठी आणि हिंदीमधील अजरामर गाण्‍यांना चाली देऊन संगीत क्षेत्रात आपले अढळ स्‍थान निर्माण करणा-या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका कविता कृष्‍णमुर्ती यांना सन 2021 चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार जाहीर करण्यात आला. याबाबतची घोषणा भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज केली.

आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून एक लाख रू. रोख, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोहम्मद रफी यांचे कुटुंबीय आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या तेरा वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

यावर्षी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर आणि कविता कृष्‍णमुर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, या दोघांचेही संगीत जगतात मोठे योगदान असून त्‍यांचा सन्‍मान करण्‍याची संधी आम्‍हाला मिळाली याबद्दल आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६ वा. सुरू होणार असून राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्‍या हस्‍ते यावर्षी या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे फिर रफी या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण, सरिता राजेश हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. कोरोनाचे नियम पाळून नाट्यगृहाच्‍या पन्‍नास टक्‍के क्षमतेने रसिकांना प्रवेश दिले जाणार आहेत.

यापुर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, मरणोत्‍तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT