पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्वारगेट परिसरात दहशत निर्माण करणार्या कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार ही कारवाई केली.
टोळी प्रमुख सचिन परशुरा (वय-24,रा.गुलटेकडी,पुणे), निखील राकेश पेटकर (22,रा.बिबवेवाडी,पुणे), रोहित मधुकर जाधव (27), अजय प्रमोद डिखळे (24), यश किसन माने (18), अमर तानाजी जाधव (23), विजय प्रमोद डिखळे (18), मोन्या ऊर्फ सुरज सतिश काकडे ((26, सर्व रा.गुलटेकडी, पुणे) व एक विधीसंघर्षित बालक आणि इतर चार पाहिजे असलेले साथीदार यांच्यावर सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. संबंधित टोळीवर आजूबाजूच्या भागात दरोडा, जबरी चोरी, खंडणी, हफ्ता गोळा करणे, अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्याच्या हेतून खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, दरोडा, मारामारी, मुलींची छेडाछाड काढणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत सदर आरोपींनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागील काळात केले असल्याने त्यांना सन 2021 मध्ये एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले होते. परंतु, त्यातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले साथीदार एकत्र करुन खुनाचा प्रयत्न व दुखापतीचे गुन्हे करत जबरदस्तीने दहशत करुन हप्ते वसुली केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा एकचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार करत आहे.
सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकाने मोक्काचा अहवाल तयार केला होता. तो अहवाल परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त डहाळे यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी मोक्काला मंजुरी दिली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही मोक्काची 16 वी कारवाई आहे.