पुणे; पुढारी वृत्तसेवा : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांना स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागला. ही घटना येरवडा येथील पोतेवस्ती येथे गुरुवारी (दि. ३१) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्व धर्मसमभाव नावाची म्हाडाची वसाहत आहे. या नागरिकांना शक्तीसिंग सुरजसिंग बावरी (वय 22) नावाचा गुन्हेगार व त्याचे साथीदार परिसरातील नागरिकांना त्रास देत होते. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस पथक शक्ती याला पकडायला गेले. त्यावेळी बावरी याने शिकलकरी समाजातील नागरिकांना एकत्र करून पोलिसांविरुद्ध भडकावले. त्यानंतर तेथील नागरिक पोलिसावर चालून आले. यावेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ बंदुकीतून हवेत गोळीबार केला. एक राउंड हवेत पोलिसांनी फायर केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला आणि शक्तीसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
शक्तीसिंगबावरी हा सराइत गुन्हेगार असून, त्याला तडीपार करण्यात आले होते. त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याने नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या तक्रारीवरून त्याला ताब्यात घेतले.
युनूस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे