कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या राजकारणातील पारंपरिक विरोधक असलेले आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक शनिवारी शाहू समाधी स्थळी समोरासमोर आले. मात्र, दोघांनीही साधी नजरानजरही केली नाही.
आ. पाटील आणि खा. महाडिक यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष आहे. राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने तो टोकाला गेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शाहू समाधी स्थळी अभिवादन कार्यक्रमासाठी आ. पाटील, खा. महाडिक उपस्थित होते. मात्र, त्यांनी एकमेकांकडे बघण्याचेही टाळले. आ. पाटील यांनी समाधी स्थळी आल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. यानंतर ते मंत्री पाटील यांच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर दोन्ही माजी पालकमंत्र्यांत बराच काळ चर्चा सुरू होती. चर्चेतून होणार्या हास्यविनोदात दोघेही रंगून जात होते.
याच दरम्यान खा. महाडिक आले. उपस्थितांशी हस्तांदोलन करत ते मंत्री पाटील यांच्यापर्यंत आले. त्यांच्याशी हस्तांंदोलन करत ते विरुद्ध बाजूला आमदार पी. एन. पाटील यांच्या शेजारी जाऊन बसले. यानंतर आ. पाटील व मंत्री चंद्रकांत पाटील, खा. महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील अशी बराच वेळ चर्चा सुरू होती. कार्यक्रमानंतरही त्याचीच चर्चा होती.
कार्यक्रमस्थळी आलेल्या आमदार पी. एन. पाटील यांना पाहताच मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पी. एन. वजन कमी झालेय. शारीरिक वजन कमी होऊ दे; पण राजकीय वजन तेवढे कमी होऊ देऊ नका.