file photo 
Latest

पायाखालची वाळू घसरल्यानेच मंडलिक यांच्याकडून शाहू महाराज यांचा अपमान : आमदार सतेज पाटील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वैयक्तिक टीका करणार नाही, असे काही दिवसांपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून स्पष्ट केले असताना, खा. संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल खालच्या पातळीवर केलेले वक्तव्य हे त्यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याचे लक्षण आहे. शाहू महाराज यांचा अपमान करून मंडलिक यांनी सुरुवात केली आहे, त्याचा शेवट कोल्हापूरची स्वाभिमानी जनता करेल, असा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला.

शाहू महाराज यांच्याबद्दल मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, निवडणुकीत लाखाच्या पुढे लीड वाढत असल्याचे दिसून आल्यामुळे मंडलिक यांच्याकडून अशा पद्धतीची वक्तव्ये होत आहेत. हे सहन करणार नाही. त्याचा निषेध करतो. त्यांनी वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी. शाहू महाराज यांच्यावरील आरोप शाहू प्रेमी जनता कदापि सहन करणार नाही. ही स्वाभिमानी जनताच त्याला उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

निवडणूक हातातून चालल्याने अशी वक्तव्ये करून निवडणूक वेगळ्या दिशेला नेण्याचा मंडलिक यांचा प्रयत्न दिसतो. परंतु, त्याचा उपयोग होणार नाही. त्यांचे सल्लागार कोण, हे माहीत नाही. निवडणुकीत कुस्ती करा; परंतु असे वक्तव्य करणे योग्य नाही. पातळी सोडत असाल, तर निवडणूक बाजूला राहील, जनताच त्याचे उत्तर देईल. मंडलिक यांचा बोलवता धनी कोण, हे महायुतीच्या नेत्यांनी शोधून काढावे, असेही आ. पाटील म्हणाले.

विरोधकांनी खालची पातळी गाठली : शरद पवार

राजघराण्यांमध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. या विषयावर भाष्य करून विरोधकांनी किती खालची पातळी गाठली, ते लक्षात येते. मूळ राजर्षी शाहू महाराज यांचा सेवेचा गुण होता. तीच भूमिका आताच्या शाहू महाराजांनी घेतली आहे. मात्र, अशा वक्तव्यांतून विरोधकांची मानसिकता दिसून येते, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

खा. मंडलिक यांना काही कळते का? : खा. उदयनराजे

खासदार संजय मंडलिक काय म्हणाले, हे मला माहिती नाही. पण, शाहू महाराज यांच्याविषयी त्यांनी वक्तव्य केले असेल, तर ते चुकीचे आहे. खा. मंडलिक यांना काही कळते का? अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

गादीचा अपमान जनता सहन करणार नाही : खा. राऊत

शाहू महाराज यांच्याविषयी राज्यातील जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत. गादीचा अपमान कोणी करत असेल, तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT